मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून रखडलेला रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला असून, महायुती सरकारने शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्यावर रायगडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली आहे. तर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रिपद गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आले आहे. राज्य शासनाने आज यासंदर्भातील आदेश जारी केले.

दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती दिली होती. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा विषय दीर्घकाळ प्रलंबित होता. रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना शिंदे पक्ष आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही रस्सीखेच सुरू होती.

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने १५ ऑगस्ट रोजी रायगड जिल्ह्यात ध्वजारोहणाची जबाबदारी भरत गोगावले यांच्याकडे सोपवण्यात आली होती. त्याचवेळी गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्रिपदी वर्णी लागण्याचे संकेत मिळाले होते. अखेर आज शासनाच्या आदेशाने या चर्चेला अधिकृत दुजोरा मिळाला.

यापूर्वी रायगडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे होती. गोगावले आणि तटकरे यांच्यात पालकमंत्रिपदावरून गेल्या दोन वर्षांपासून राजकीय रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा होती.

 अदिती तटकरे यांचे बंधू अनिकेत तटकरे यांच्या विधानपरिषद निवडीवेळी शिवसेना शिंदे गटाने केलेल्या सहकार्याच्या पार्श्वभूमीवर रायगडचे पालकमंत्रिपद गोगावले यांना देण्याचा राजकीय समझोता झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रायगडचे पालकमंत्रिपद मिळवण्याची गोगावले यांची सुप्त इच्छा अखेर पूर्ण झाली आहे.