अलिबाग- जवळपास पावणे दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भरत गोगावले यांना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद बहाल करण्यात आले आहे. मात्र जिल्ह्यातील विवीध प्रश्नांची सोडवणूक करण्याबरोबरच, महायुती मधील अंतर्गत विसंवाद आणि कुरघोड्या रोखणे हे गोगावले यांच्या समोरील सर्वात मोठे आव्हान असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटात सुरू असलेला वादावर पडदा टाकण्याचे कामही त्यांना करावे लागणार आहे.

शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातील टोकाच्या संघर्षामुळे जवळपास पावणे दोन वर्ष रायगडचे पालकमंत्रीपद स्थगित ठेवण्यात आले होते. हा तिढा विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य निवडणुकीनंतर सुटला. शिवसेना शिंदे गटाने निवडणूकीतून माघार घेतल्याने, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे विजयी झाले, या बदल्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने रायगडच्या पालकमंत्री पदावरील आपला दावा सोडला. त्यानुसार सोमवारी भरत गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्री पदावर वर्णी लागली. त्यामुळे शिवसेना शिंदे गटात उत्साहाचे वातावरण आहे.

मात्र हे पद संभाळतांना गोगावले यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. पक्षांर्गत अतिउत्साही नेते आणि कार्यकर्त्यांना थोपविण्याबरोबरच, महायुतीमधील समन्वय आणि एकोपा कायम रहावा यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसशी जुळवून घेण्याचे धोरणही स्विकारावे लागणार आहे. आजवर ज्या तटकरे कुटूंबाशी संघर्ष केला त्यांनाच सोबत घेऊन पुढे जावे लागणार आहे. त्यामुळे प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर गोगावले यांच्यावर पालकमंत्री पदाची जबाबदारी आली असली तरी हे शिवधनुष्य पेलणे सोपे असणार नाही.

सत्तेत सोबत असूनही ज्या राष्ट्रवादी काँग्रेसनी सतत संघर्ष केला. ज्या पक्षातील नेत्यांना टोकाचा विरोध केला त्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी जुळवून घेण्याची वेळ आता गोगावले यांच्यावर येणार आहे. पालकमंत्री पदाच्या खूर्चीत बसून राष्ट्रवादी काँग्रेसशी संघर्ष करणे त्यांना शक्य होणार नाही. जिल्हा नियोजन समितीवरील नियुक्त्या असो, अथवा विकास कामांचे वाटप असो, त्यात महायुतीमधील घटक पक्षात निधी वाटपावरून वाद होणार नाही याची खबरदारी गोगावले यांना घ्यावी लागणार आहे. त्यामुळे गोगावले या बदललेल्या परिस्थितीला कसे सामोरे जाणार हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

खासदार सुनील तटकरे आणि महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांची जिल्ह्याच्या प्रशासनावर घट्ट पकड आहे. त्यांना जिल्ह्यातील विकास कामांसाठी निधी कसा आणि कुठून येतो, प्रशासकीय यंत्रणांकडून कामे कशी करून घेतली जातात याची अचूक जाण आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणांवर तटकरे कुटूंबाचा वचक आहे. अशा परिस्थितीत पालकमंत्री म्हणून स्वतःची वेगळी छाप पाडणे, प्रशासनावर स्वतःची पकड निर्माण करण्याचे काम गोगावले यांना यापूढील काळात करावे लागणार आहे. जिल्हा परिषदे असो अथवा नगर परिषद, नगर पंचायती आणि पंचायत समितीसारख्या स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यात महायुती मधील घटक पक्षात समन्वय आणि एकोपा राहील यासाठी व्यापक प्रयत्नही गोगावले यांना करावे लागण्याची शक्यता आहे.