राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. या दरम्यान शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे नेते महाड–पोलादपूर मतदारसंघाचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे फलोत्पादन व रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांचा जिल्हा परिषद निवडणुकीत विजय झाला आहे. महाड नगरपालिका निवडणुकीवेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये तुफान हाणामारी झाली होती. या प्रकरणात भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावलेंसग अनेक जणांवर गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर हे सर्वजण बरेच दिवस फरार होते. हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते.

या पार्श्वभूमीवर महाड येथील जिल्हा परिषदेची निवडणूक भरत गोगावले यांनी प्रतिष्ठेची केली होती. मुलाला विजयी करण्यासाठी त्यांनी मोठा जोर लावला होता. दरम्यान नडगाव बिरवाडी या गटातून विकास गोगावले यांच्या विजयानंतर भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भरत गोगावले म्हणाले की, “हा जनतेचा विजय आहे. मतदार बांधव, कार्यकर्ते, महिला आघाडी, युवासेना, शिवसेना आणि माझ्या कुटुंबाने प्रचंड मेहनत घेतली त्याचा हा विजय आहे. आम्ही जनतेतील कार्यकर्ते आहोत. मी आमदार आहे, मंत्री आहे, संत्री आहे तरी देखील आम्ही कधी तोरा मिरवत नाही, मिरवणार नाही. मी नेहमी जमिनीवरून चालतो. काही लोकं हवेतून चालचाच. जे हवेतून चालणारे होते त्यांना परत एकदा घरी बसवलेलं आहे,” असे भरत गोगावले म्हणाले.

विकास गोगावले निवडून येऊ नयेत म्हणून अनेक प्रयत्न झाले तरीही त्यांचा विजय झाला, याबद्दल विचारले असता भरत गोगावले म्हणाले की, “बऱ्याचशा लोकांनी असा पण केला होता, की उभरतं व्यक्तीमत्व आत्ताच त्याला कट केला तर पुढे भविष्यात उभा राहाणार नाही, असे त्यांचे मनसुबे होते. माझ्या मतदारसंघातील जनतेने फोल ठरवले आहेत. विकासला थोड्या थोडक्या नाही तर ५ हजारांच्या पुढे मताधिक्याने निवडून दिले आहे, असे भरत गोगावले म्हणाले.

आम्ही काम करतो त्याचं हे चित्र आहे. आम्ही कोणावर टीका टिप्पणी करत नाहीत. आम्हाला करायची पण नाही. वस्तूस्थिती लोकांसमोर मांडण्याचं काम केलं आहे त्याचा हा विजय आहे, असेही गोगावले म्हणाले.