अलिबाग – राजकारणात कोणी कोणाचा कायम शत्रूही नसतो आणि मित्रही नसतो असे म्हणतात. याची प्रचिती पुन्हा एकदा रायगडकरांना आली. एकमेकांवर टीकेची जोड उठवणारे कोपरखळ्या मारणारे दोन नेते पुन्हा एकदा एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. रोजगार हमी मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यातील मतभेदाची दरी गणेशोत्सवाच्या निमित्ताने कमी होत असल्याचे दिसून आले.
गेली पावणे दोन वर्ष रायगडच्या पालकमंत्री पदावरून तटकरे कुटुंब आणि भरत गोगावले यांच्यात टोकाचा संघर्ष सुरू होता. आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्री पद दिल्याने वाद उफाळून आला होता. यानंतर गोगावले यांच्या विरोधात निवडणूक लढविणाऱ्या स्नेहल जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेतल्याने संघर्ष विकोपाला गेला होता. नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही पक्षात वाद झाले. प्रकरण धक्काबुक्की आहे बंदूक रोखण्यापर्यंत गेले होते. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विरोधात गुन्हे दाखल झाले. मंत्री. भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना अटकही झाली होती. सुनील तटकरे यांनी महाडमध्ये गोगावले यांच्या रुमाल हाताळण्याची नक्कल करून नक्कल करून गोगावले यांना डीवचले होते. त्यामुळे महायुतीत दोन सत्ताधारी पक्षात कमालीची धुसफुस पाहायला मिळत होती.
पण रायगडचे पालकमंत्री पद शिवसेनेच्या भरत गोगावले यांना मिळाल्यानंतर आणि विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या अनिकेत तटकरे यांची आमदारकी मिळाल्यानंतर दोन्ही कुटुंबातील वादांवर पडदा पडत असल्याचे दिसून येत आहे. जुने वाद विसरून दोन्ही नेते एकत्र येऊ लागल्याचे पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्या घरी श्री गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. या गणेशाच्या दर्शनासाठी पालकमंत्री भरत गोगावले दाखल झाले. तटकरे कुटुंबीयांनी त्यांचे अगत्याने स्वागत केले. गौरी गणपतीचे दर्शन घेऊन गोगावले यांनी विविध विषयांवर चर्चा केली. राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी या भेटीची छायाचित्र समाज माध्यमांवर प्रसारित केली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. राजकारणात काहीही होऊ शकते अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली.
शिवसेनेचे दोन्ही आमदार महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे सध्या तटकरे कुटुंबियांविरोधात आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. अशावेळी गोगावले यांनी तटकरे यांच्या घरी जाऊन घेतलेली भेट दोन्ही आमदारांसाठी अस्वस्थता वाढवणारी ठरणार आहे.
