सांगली : ग्रामीण जीवन, समाजभान व परिवर्तनशील विचारांची समृद्ध परंपरा जपणारे  गेल्या ३६ वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेले हे संमेलन ग्रामीण साहित्य चळवळीचे प्रभावी व्यासपीठ ठरत असून अनेक नामवंत व नवोदित साहित्यिकांना दिशा देणारे ठरले आहे. नवोदित साहित्यिकांना संधी व मार्गदर्शन मिळावे यासाठी भारती विद्यापीठात नवीन अध्यासन सुरू करण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन  उद्घाटक आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी केले.

स्वामी विवेकानंद ग्रामविकास मंडळ व पलूस तालुका ग्रामीण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या संमेलनाचे उद्घाटन आमदार डॉ. कदम यांच्या हस्ते झाले. संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक नामदेव माळी  यांनी जबाबदारी सांभाळली. प्रमुख पाहुणे म्हणून विश्वनाथ गायकवाड, कवी संमेलनाध्यक्ष आनंद हरी ,मनीषा पाटील, नगराध्यक्षा संजीवनी पुदाले,तानाजी चव्हाण, डॉ. स्मिता पाटील आदी उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी आमदार डॉ. कदम म्हणाले की, ग्रामीण साहित्य हे समाजातील वास्तव, संघर्ष व आशेचे प्रतिबिंब आहे. पलूसमधील ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाने गेल्या अनेक वर्षांत साहित्य चळवळीबरोबरच सामाजिक बांधिलकी जपली आहे. स्वामी विवेकानंद ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून राबविले जाणारे समाजोपयोगी उपक्रम कौतुकास्पद असून अशा उपक्रमांमुळे साहित्य समाजाशी अधिक घट्ट जोडले जाते, असे ते म्हणाले.

 अध्यक्षपदावरून बोलताना श्री.माळी म्हणाले, काळानुसार साहित्य संमेलनांचे स्वरूप बदलणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात नवे साहित्यिक घडवायचे असतील तर शालेय विद्यार्थ्यांसाठी कथाकथन, कादंबरी व सर्जनशील लेखन कार्यशाळा सातत्याने घेतल्या पाहिजेत. चांगले वाचक तयार झाले तरच दर्जेदार साहित्यनिर्मिती होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे स्वागत प्रा. संतोष काळे व प्रास्ताविक वासंती मेरू यांनी केले. मांडले. मान्यवरांचा परिचय प्रा. संपतराव पार्लेकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन श्रीकांत माने यांनी केले तर आभार प्रदर्शन उमा पुदाले यांनी मानले.