scorecardresearch

“उद्धव ठाकरेंना एकटं पाडलं जात असताना त्यांचे नातेवाईक पाठीशी उभे राहिले तर…”; भास्कर जाधवांची मनसे- शिवसेनेसंदर्भात प्रतिक्रिया

रविवारी पुण्यामध्ये राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी शिवसेना- भाजपा युतीच्या प्रश्नावरुन केलं होतं सूचक विधान

“उद्धव ठाकरेंना एकटं पाडलं जात असताना त्यांचे नातेवाईक पाठीशी उभे राहिले तर…”; भास्कर जाधवांची मनसे- शिवसेनेसंदर्भात प्रतिक्रिया
पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना भास्कर जाधवांचं विधान

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी शिवसेना आणि मनसेसंदर्भात सूचक विधान केलं होतं. याचवरुन आज शिसवेनेचे आमदार भास्कर जाधव यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभं राहणाऱ्यांनी जुना राग विसरायला हवा असंही ते म्हणालेत.

पुण्यात मनसेच्या “गणपती आमचा किंमत तुमची २०२२” या कार्यक्रमानिमित्त रविवारी शर्मिला ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी त्यांना पत्रकारांनी, “आता परत दोन ठाकरे भावांनी एकत्र यावे असं वाटतं का?” असा प्रश्न विचारला. यावर शर्मिला यांनी, “तुम्हाला वाटतं?” असा प्रतिप्रश्न पत्रकारांना विचारला आणि पुढे, “आमच्या वाटण्यावर काहीही नाही,” असं उत्तर दिलं. त्यानंतर पत्रकारांनी, ” आता एकटे पडलेत उद्धव ठाकरे. तुम्हाला असं वाटतं का ही योग्य वे्ळ आहे. साद घातली तर…” असं म्हणत प्रश्न विचारण्याआधीच शर्मिला यांनी, “साद घातली तर… येऊ देत… मग बघू” असं उत्तर दिलं.

मनसे-शिवसेना युतीसंदर्भात शर्मिला ठाकरेंनी केलेल्या याच विधानावर शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. “शर्मिलाताई ठाकरे काय बोलल्या हे मी ऐकलेलं नाही. दुसरी गोष्ट कोणाशीही युती वगैरेसारख्या विषयावर बोलणं हे माझ्यासारख्या माणसासाठी योग्य नाही पण आज ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंना सगळ्या बाजूने घेरण्याचा जो प्रयत्न सुरु आहे. या अशावेळी उद्धव ठाकरेंच्या बाजूने संपूर्ण महाराष्ट्र उभा राहू पाहत आहे,” असं म्हटलं.

पुढे जाधव यांनी, “जर त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक कुठल्याही प्रकारचा पूर्वीचा राग, रोष मनामध्ये न ठेवता या प्रसंगामध्ये उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे उभे राहीले तर त्याचा निश्चितपणे माझ्यासारख्या सामान्य माणसाला आनंदच होईल,” असंही म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या