चिपळूण: चिपळूणच्या राजकीय वर्तुळात सध्या एकाच चर्चेने जोर धरला आहे. तो म्हणजे शिवसेना (उबाठा)चे नेते आमदार भास्कर जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)चे आमदार शेखर निकम यांची अनपेक्षित भेट पुढे राजकीय समीकरणे बदलणारी ठरणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या सत्तास्थापनेच्या गुंतागुंतीच्या परिस्थितीमुळे ही चर्चा अधिकच रंगू लागली आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी राजकीय विरोधक असलेले आमदार भास्कर जाधव आणि आमदार शेखर निकम अनावधानाने आमनेसामने आले होते. त्या भेटीत कटुता नव्हे तर सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन घडले. दिलखुलास संवाद आणि सौजन्यपूर्ण वागणुकीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यावेळी ती केवळ ‘औपचारिक भेट’ मानली गेली असली, तरी आता तीच भेट सत्तेच्या दिशेने जाणारा पहिला इशारा ठरतेय का, असा सवाल उपस्थित होत आहे.

चिपळूण पंचायत समितीतील १८ गणांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) ७ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. शिवसेना (उबाठा) गटाला ४, युतीतील शिवसेना शिंदे गटाला ४ आणि भाजपला ३ जागा मिळाल्या आहेत. एकट्या राष्ट्रवादीकडे बहुमत नसल्याने सत्ता स्थापनेसाठी अन्य पक्षांची साथ अपरिहार्य ठरते.

चिपळूण पालिकेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती झाल्याने राष्ट्रवादीला बाहेर ठेवण्यात आले होते. त्याचा मोठा फटका राष्ट्रवादीला बसला आणि केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. त्या कटू अनुभवातून बोध घेत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका राष्ट्रवादीने स्वतंत्र ताकदीवर लढवण्याचा निर्धार केला. आमदार शेखर निकम यांनी कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करत ‘एकला चलो’ची भूमिका घेतली.

निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात असतानाच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने राष्ट्रवादी पक्षावर दुःखाचा डोंगर कोसळला. आमदार शेखर निकम यांच्यासाठी तो मोठा मानसिक आघात होता. मात्र त्यातून सावरत त्यांनी कोणतीही भव्य सभा, स्टार प्रचारक किंवा वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती न घेता, केवळ ‘डोअर टू डोअर’ प्रचारपत्रकांच्या माध्यमातून प्रचार केला. हीच प्रचारशैली मतदारांच्या मनाला भिडली, असे निकालातून स्पष्ट झाले. दुसरीकडे, युतीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चिपळूणमध्ये जाहीर सभा घेतली. मात्र यावेळी त्यांची जादू फारशी चालली नाही. निकालात शिवसेना शिंदे गटाला ४ आणि भाजपला ३ जागांवरच समाधान मानावे लागले.

पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांतील कटू अनुभव पाहता आमदार शेखर निकम युतीच्या मदतीने सत्ता स्थापन करतील, असे सध्या तरी वाटत नाही. मात्र राष्ट्रवादीचा सभापती आणि समान भूमिकेवर सहमत असलेल्या पक्षांसोबत सत्ता स्थापन केली जाईल, असे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन पंचायत समितीत सत्ता स्थापन करतील, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.चिपळूणच्या राजकारणात निर्णायक क्षण एकेकाळचे राजकीय विरोधक असलेले आमदार भास्कर जाधव आणि आमदार शेखर निकम जर एकत्र आले, तर चिपळूणच्या राजकारणात तो मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. ‘ती’ भेट पुढे सत्तेची ‘गोड’ सुरुवात ठरते की नाही, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार असले तरी चिपळूणवासियांची उत्सुकता मात्र शिगेला पोहोचली आहे.

चिपळूण पंचायत समितीमध्ये सभापती पदासाठी जो पक्ष पाठिंबा देईल त्याचा पाठिंबा घेऊन सत्ता स्थापन करू. – शेखर निकम, आमदार चिपळूण.