चिपळूण : महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली चिपळुणात निघालेल्या महामोर्चातून शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी आपल्या राजकीय ताकदीचे शक्तिप्रदर्शन केले. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकारविरोधात सातत्याने आक्रमक भूमिका मांडणाऱ्या जाधवांनी ‘लोकशाही वाचवा’चा नारा देत निवडणूक आयोगाच्या कारभाराचा मुद्दा ऐरणीवर आणला. उत्तर रत्नागिरीतील महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने मोर्चाने शहराचे लक्ष वेधून घेतले. काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनीही मोर्चाचे प्रतिनिधित्व केले.

मार्कंडी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. चिंचनाका मार्गे प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. हातात फडकणारे विविध पक्षांचे झेंडे, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी आणि मोठ्या संख्येने झालेली उपस्थिती यामुळे परिसरात राजकीय वातावरण निर्माण झाले.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी प्रमुख मागणी मोर्चातून करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हतेबाबत निर्माण झालेल्या शंकांचे निरसन झाले पाहिजे, अशी भूमिका नेत्यांनी मांडली.

महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह विविध घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले. विविध पक्षांचे राजकीय मतभेद बाजूला ठेवून लोकशाही आणि संविधानाच्या मुद्द्यावर एकत्र येण्याचे चित्र या निमित्ताने दिसले. त्यामुळे मोर्चा आघाडीचा असला, तरी त्याचे नेतृत्व आणि स्थानिक राजकीय केंद्रबिंदू भास्कर जाधव हेच राहिल्याचे चित्र निर्माण झाले.

निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीचा महत्त्वाचा आधार असून मतदारांचा तिच्यावरील विश्वास अबाधित राहणे आवश्यक आहे. मतदार याद्या, निवडणूक प्रक्रिया आणि आयोगाच्या निर्णयांबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांना पारदर्शक उत्तरे मिळाली पाहिजेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

मोर्चात सहभागी कार्यकर्त्यांनी विविध घोषणा देत निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात भूमिका मांडली. सर्वसामान्य नागरिकांचीही उपस्थिती राहिली. त्यामुळे महाविकास आघाडीच्या राजकीय एकजुटीबरोबरच भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक संघटनशक्तीचे दर्शन या मोर्चातून घडले.संविधानाचे संरक्षण, लोकशाही संस्थांची स्वायत्तता आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी पुढील काळातही संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.