Bhaskar Jadhav Milind Narwekar statement : शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनाला आमदार भास्कर जाधव यांनी मिलिंद नार्वेकर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान काढले. नार्वेकरांनी गाडीचा हॉर्न सतत वाजवल्याने जाधवांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे शिवसेनेतील (उद्धव ठाकरे) अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले असल्याची चर्चा रंगली. मात्र, यावर आता भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली असून आमच्यात वाद नसून चांगली मैत्री आहे, असं ते म्हणाले. ते आज माध्यमांशी बोलत होते.
षण्मुखानंद हॉलमध्ये नेमकं काय घडलं?
भास्कर जाधव म्हणाले, “मुळात मिलिंद नार्वेकर हे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत. आमच्यात कोणतेही मतभेद किंवा वाद नाहीत. समज-गैरसमजातून सुरुवात झाली. १९ तारखेला षण्मुखानंद हॉलमध्ये कार्यक्रम होता. तेथे प्रचंड गर्दी जमली होती. अनेकांना हॉलमध्ये जायचं होतं. माझी गाडी आली तेव्हा सर्व शिवसैनिकांनी गराडा घातला आणि मला विनंती केली की आम्हालाही घेऊन चला. म्हणून मी गाडीतून उतरून लोकांना समजावत गेटच्या आतमध्ये गेलो. तेव्हा एका माध्यम प्रतिनिधींनी माझी प्रतिक्रिया घेतली. त्यादरम्यान कोणाच्या तरी गाडीचा हॉर्न वाजत होता. समोर शिवसैनिक प्रचंड गर्दी करून होते, त्यांना आतमध्ये यायचं होतं. म्हणून बराच वेळ हॉर्न वाजत होता. हॉर्न वाजत असताना दरवाजा उघडला गेला, तेव्हा पाच पंचवीस शिवसैनिक दोन्ही बाजूला पडले. तेव्हा मी सहज विचारलं की कोणाची गाडी आहे? तेव्हा त्या रिपोर्टर म्हणाल्या की नार्वेकरांची गाडी आहे”, अशी संपूर्ण माहिती त्यांनी दिली.
कोणते नार्वेकर हे क्लिकच झालं नाही
ते पुढे म्हणाले, “खरंतर माझ्या डोक्यात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर बसलेले आहेत. त्यामुळे कोणते नार्वेकर हे मला फार क्लिक झालं नाही. म्हणून मी एका क्षणात बोलून गेलो की नार्वेकर असले तर काय झालं? त्यानंतर नार्वेकरांना ‘कोण नार्वेकर?’ हा शब्द लागला. नार्वेकरांना मी कणखर समजतो, सर्व पक्षातील लोकांचे चांगले संबंध आहेत, हे जगजाहीर आहेत. नार्वेकरांची गाडी समजून मी विधान केलेलं नाही.”
आमच्यात वाद नाही
“पण नार्वेकरांनी ज्या पद्धतीने एक्सपोस्ट केली, त्यानुसार जर मला विरोधी पक्षनेते पद मिळणार असेल तर मला आनंदच आहे. मला विरोधी पक्षनेते पद न दिल्याचा सर्वांत जास्त त्रास त्यांनाच होत आहे. आमच्यात काही भांडण नाही. मिलिंद नार्वेकरांनी मनावर घेतल्याने मुख्यमंत्र्यांकडून माझी विरोधी पक्षनेता म्हणून निवड होणार असेल तर माझ्या अपेक्षा वाढल्या आहेत”, असंही ते उपहासाने म्हणाले.
शिवसेनेच्या मेळाव्यात नार्वेकर का येतील? असा प्रश्नही माध्यमांनी यावेळी विचारला. त्यावर ते म्हणाले, शिवसेनेच्या मेळाव्यात नार्वेकर का येतील? हा प्रश्नच आहे. पण मिलिंद नार्वेकर एकटेच नार्वेकर आहेत का? माझ्या डोक्यात राहुल नार्वेकरच बसलेले आहेत. मिलिंद नार्वेकर आणि मी चांगले मित्र असून आता बैठकीला भेटणार आहोत. ते एवढे नाजूक आणि हळवे असतील हे मला माहीत नव्हतं. पण आमची मैत्री असल्याने ते हळवे झाले”, असंही स्पष्टीकरण त्यांनी दिलं.
