मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणमधील परिस्थितीची रविवारी पाहणी केली. यावेळी त्यांना व्यापारी आणि ग्रामस्थांशीही संवाद साधला. मात्र, मुख्यमंत्र्यांचा हा पाहणी दौरा चर्चेचा विषय ठरला तो आमदार भास्कर जाधव यांच्यामुळे. भास्कर जाधव यांचा महिलेशी अरेरावी करतानाचा एक व्हिडीओ समोर आला आणि त्यावरून त्याच्याविरुद्ध संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. भास्कर जाधव यांनी महिलेशी केलेल्या संवादावरून भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी निशाणा साधला आहे. “भास्कर जाधव आपल्या मालकाला खूश करण्यासाठी असा प्रकार करत आहेत”, असं म्हणत शेलार यांनी खडेबोल सुनावले आहेत.

चिपळूणमध्ये मदतीची विनवणी करणाऱ्या एका महिलेल्या भास्कर जाधव यांनी दिलेल्या उत्तरावरून वाद निर्माण झाला. भास्कर जाधव यांची बोलण्याची पद्धत चुकल्याचं सांगत सोशल मीडियावर अनेक तीव्र नाराजी व्यक्त केली भाजपाकडूनही यावर टीका करण्यात आली. देवेंद्र फडणवीस आणि चित्रा वाघ यांच्यापाठोपाठ भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी भास्कर जाधव यांच्यावर निशाणा साधला. आशिष शेलार म्हणाले,”भास्कर जाधव यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेतच गैरवर्तन केलं होतं. विधानसभा अध्यक्षांच्या कक्षात गैरवर्तन केलं होतं. त्या गैरवर्तनाचा जाहीर कार्यक्रम त्यांनी आज जनतेसमोर ठेवला. हे होणारच होतं. ज्यांना जनतेच्या नाळेपेक्षा स्वःपक्षाची नाळ मोठी वाटते. आपल्या मालकाला खुश करण्यासाठी जनतेला लाथ मारावी असं वाटतं. तेच लोक भास्कर जाधव सारखं करतात”, अशी टीका शेलार यांनी केली.

संबंधित वृत्त- महिलेसोबत अरेरावी केल्यानंतर झालेल्या वादावर भास्कर जाधवांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

मुसळधार पाऊस झाल्यानं मुंबई तुंबली होती. त्यावरूनही आशिष शेलार यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं. “आज २६ जुलै दुर्दैवाने मुंबईकरांच्या कायमचा लक्षात राहणारा दिवस आहे. अनेक वर्ष उलटूनही परिस्थिती काही बदलली नाही. इतकी वर्ष सत्तेत राहून शिवसेनेनं मुंबईकरांशी गद्दारी आणि फितुरी केली आहे. दरवर्षी निसर्गावर खापर आणि काही लोकांच्या घरावर सोन्याचं छप्पर. कोकण आणि साताऱ्यातील परिस्थिती पाहतोय. चिखलाचे डोंगर, मृत्यूचं थैमान हे पाहून मुंबईत शिवसेनेला काही करावं असं वाटतं नाही. कोट्यवधींच्या प्रोजेक्टच्या नावाखाली १६ वर्षात ३ लाख २० हजार कोटीचा खर्च मुंबईकरांसाठी केला. मात्र खर्च करून चित्र काय… तर तेच. मग हे पैसे गेले कुठे? सत्ताधारी शिवसेनेला याचं उत्तर द्यावं लागेल”, असा इशारा शेलार यांनी दिला.