चिपळूण – चिपळूण पालिका निवडणुकीत आमदार भास्कर जाधव यांनी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात माजी खासदार विनायक राऊत यांनी निर्णय घेतला. त्यामुळे ठाकरे गटाचे उमेदवार पराभूत झाले. त्यामुळे भास्कर जाधव यांनी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून अंग काढले आहे. त्यांनी केवळ गुहागर तालुक्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्याचा फटका ठाकरे गटाच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे. 

चिपळूण पालिका निवडणुकीत आमदार भास्कर जाधव यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर आघाडी केली होती आणि शहरातील काही जागा पदरात पाडून घेतल्या होत्या. तसेच नगराध्यक्ष पदासाठी माजी आमदार रमेश कदम यांना पाठिंबा दिला होता परंतु भास्कर जाधव यांच्या निर्णयाविरोधात विनायक राऊत यांनी निर्णय घेत सर्वच जागांवर उमेदवार उभे केले आणि नगराध्यक्ष पदासाठी ही उमेदवार दिला. विनायक राऊत उमेदवारांच्या प्रचारासाठी ही आले नाही. त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी दिलेल्या उमेदवाराला जेवढी मध्ये पडली, तेवढ्याच मताने रमेश कदम यांचा पराभव झाला. त्यामुळे विनायक राऊत यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार का दिला हे अनेकांच्या लक्षात आल्यानंतर काठावर पराभूत झालेले आणि राऊतांच्या निर्णयातून नाराज झालेल्या ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी पक्ष सोडण्यास सुरुवात केली आहे. तसेच भास्कर जाधव यांनीही जिल्ह्यातील राजकीय प्रक्रियेतून बाजूला होण्यास सुरुवात केली आहे.

काही दिवसापूर्वी विनायक राऊत यांनी चिपळूणचा दौरा केला. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाधवांच्या नेतृत्वाखाली होतील असे राऊत यांनी स्पष्ट केले. मात्र गुहागर मध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय असलेले भास्कर जाधव जिल्ह्यात कुठेही प्रचारात सक्रिय नसल्याचे दिसले. त्यांना मानणारे जिल्ह्यातील कार्यकर्ते त्यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन आशीर्वाद घेत आहेत. 

भास्कर जाधव यांच्याकडे पक्षाने पश्चिम महाराष्ट्रातील संघटनेची जबाबदारी दिली आहे. कोकणची जबाबदारी माझी खासदार विनायक राऊत यांच्याकडे आहे. विनायक राऊत मुंबईमध्ये राहतात. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांना भास्कर जाधव यांचाच आधार घ्यावा लागतो. परंतु भास्कर जाधव यांनी निर्णय घेतल्याचे समजल्यानंतर विनायक राऊत त्यांच्या विरोधात निर्णय घेतात आणि त्यातून दोघांमधील शीतयुद्धाला सुरुवात होते. या दोघांमधील नेतृत्वाच्या लढाईमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाची हानी होण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाच्या शिवसेनेला किती जागा मिळतील मला माहित नाही परंतु गुहागर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या तीन जागा जिंकण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे येथे शंभर टक्के मला यश मिळेल. माझी लढाई भाजप बरोबर आहे ती मी जिंकणारच. – भास्कर जाधव, आमदार गुहागर