scorecardresearch

“..तर राज्य सरकारनं दोन हात करण्याची हिंमत दाखवावी”, विधानसभा अध्यक्ष निवड प्रकरणी भास्कर जाधवांचा सल्ला!

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राजकारण सुरू झालं असून भास्कर जाधव यांनी राज्य सरकारला सल्ला दिला आहे

bhaskar jadhav governor bhagatsingh koshyari
भास्कर जाधव यांचा राज्यपालांना खोचक टोला!

विधानसभा अध्यक्षांच्या निवड प्रक्रियेवरून सध्या राज्यातलं राजकारण चांगलंच पेटलं आहे. एकीकडे राज्यपालांना सरकारने पाठवलेल्या मंजुरी प्रस्तावावर अद्याप राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी निर्णय घेतलेला नसताना दुसरीकडे राज्य सरकार मात्र आज हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यावर ठाम आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून आज अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता असताना आता शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी राज्य सरकारला राज्यपालांशीच दोन हात करण्याचा सल्ला दिला आहे.

“राज्यपालांनी संवैधानिक शपथ घेतली आहे”

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. आज तरी विधानसभा अध्यक्षपदाची निवड होणार का? याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्याआधी सकाळी विधानभवनात माध्यमांशी बोलताना भास्कर जाधव यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. “कधीतरी हा सामना सरकारला करावाच लागेल. राज्यपाल हे केंद्र सरकार किंवा राज्य सरकारचे नोकर नाहीत. भारतीय राज्यघटनेच्या कलम १७८ नुसार राज्यपालांनी संवैधानिक शपथ घेतलेली असते. संवैधानिक कायद्याचं मी पालन करेन ही शपथ त्यांनी घेतलेली असते. त्यामुळे भारतीय संविधान जे सांगतं, त्यानुसार राज्यपाल वागत नसतील, तर राज्य सरकारने दोन दोन हात करण्याची हिंमत दाखवावी, असं माझं वैयक्तिक मत आहे”, असं भास्कर जाधव म्हणाले आहेत.

“नितेश राणेंना कायमचे निलंबित करा”; आदित्य ठाकरेंसंदर्भातील वक्तव्यानंतर भास्कर जाधव आक्रमक

“विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक करायची की नाही करायची, हा निर्णय मुख्यमंत्री आणि सहयोगी पक्षांच्या विधिमंडळ नेत्यांनी करायचा असतो”, असं देखील भास्कर जाधव म्हणाले.

नितेश राणे प्रकरणी भाजपावर टीकास्त्र

दरम्यान, भाजपा आमदार नितेश राणे यांच्या वक्तव्याबाबत देखील भास्कर जाधव यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं. “सभागृहातले एक सदस्य सातत्याने कुणावरतरी टीका करतायत, असंसदीय भाषा वापरत आहेत. त्यांच्याच पक्षाने नितेश राणेंना समज दिली होती. पण त्याचवेळी त्यांनी ट्वीटरवर आणि माध्यमांमध्ये सांगितलं की मी एकदा नाही, हजारवेळा असं बोलेन. काळ का सोकावला?” असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे.

Maharashtra Assembly Winter Session : “भास्कर जाधव, हे बरं नव्हं”, देवेंद्र फडणवीसांचा टोला!

“जेव्हा आम्हा १९ आमदारांना निलंबित केलं होतं, तेव्हा आम्ही त्यावर एका शब्दानं भाष्य केलं नाही अध्यक्षांना अपशब्द वापरले नाहीत, नाराजी व्यक्त केली नाही. तशाच पद्धतीने तालिका अध्यक्ष म्हणून ५ जुलैला मी भाजपाच्या १२ आमदारांना निलंबित केलं होतं. तेव्हा नितेश राणेंनी अभिरूप विधानसभेत जे वक्तव्य केलं होतं, त्याची जाणीव मी भाजपाच्या नेत्यांना करून दिली होती”, अशी आठवण देखील भास्कर जाधव यांनी यावेळी करून दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-12-2021 at 11:16 IST