२८ जानेवारीला अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. या अपघातामुळे लोकनेता महाराष्ट्रातून कायमचा निघून गेला अशीच भावना सगळ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. दरम्यान अधिवेशनाच्या आधी भास्कर जाधव यांना अजित पवारांच्या अपघाताबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यानंतर हा विषय गंभीर आहे, अजित पवारांनी १५ जानेवारीपर्यंत जी वक्तव्यं केली होती त्यानंतर अप्रत्यक्ष दम दिले गेले. अजित पवारांचा पक्ष आणि शरद पवारांचा पक्ष एकत्र येणार होते, या घडामोडी आणि अजित पवार यांचा अपघाती मृत्यू होणं हा योगायोग आहे की षडयंत्र याचा शोध तपास यंत्रणानी घ्यायला हवा असं भास्कर जाधव म्हणाले.
भास्कर जाधव काय म्हणाले?
अजित पवार यांचा अपघात होता की घातपात होता? देशात आणि राज्यात ज्यांनी ज्यांनी ती घटना पाहिली त्यांच्या मनात तो अपघात नाही तर घातपातच होता अशी भावना होती, ती भावना आजही आहे. ज्या गोष्टी आणि जी वक्तव्यं समोर येत आहेत त्यामुळे ही भावना अधिक दृढ होते आहे, अपघात झाला नाही तर घातपात झाला या विषयाला पुष्टी मिळते आहे असं भास्कर जाधव म्हणाले.
पहिल्या दिवसापासून माझ्या मनात एक विषय आहे..
अजित पवारांच्या अपघाताचा विषय गंभीर आहे. या विषयात उथळ वक्तव्य करणं योग्य नाही. पण पहिल्या दिवसापासून माझ्या मनात एक विषय होता की पिंपरी चिंचवडमध्ये भाषणात अजितदादांनी भाषणात पहिल्यांदा सांगितलं की ज्यांनी माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आणि ज्यांनी मी ७० हजार कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला त्यांच्याच मांडीला मांडी लावून मी सरकारमध्ये बसलो आहे. अजितदादांच्या या वक्तव्यानंतर तुम्ही एक एक मंत्र्यांची किंवा नेत्यांची वक्तव्यं लक्षात घ्या. अप्रत्यक्ष दम दिले गेले, तुमची फाईल निकालात निघालेली नाही. तुमची केस कोर्टात आहे. तोंडाला लगाम लावा. त्यानंतर १५ जानेवारीला अजितदादांनी पुन्हा सांगितलं माझ्याकडे भाजपाच्या फार मोठ्या भ्रष्टाचाराची फाईल माझ्याकडे आहे. त्यानंतर देखील समोर आलं की अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येत आहेत. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अजितदादांचा २८ जानेवारीला अपघात व्हावा हा योगायोग आहे की षडयंत्र आहे हे मी सांगू शकत नाही. तपासयंत्रणांनी त्याबाबत खुलासा करण्याची गरज आहे. आजपर्यंत महाराष्ट्र सरकारने, सरकारच्या वतीने किंवा केंद्र सरकारने निवेदन केलं नाही. फडणवीस सरकारनेही निवेदन केलं नाही. मोदींनीही निवेदन केलं नाही. त्यामुळे दाल में कुछ तो काला है असं भास्कर जाधव म्हणाले आहेत.
