नांदेड : गेल्या विधानसभा निवडणुकीपासून खा.अशोक चव्हाण यांच्यापासून राजकीयदृष्ट्या दुरावलेले त्यांचे मेव्हणे व नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष भास्करराव खतगावकर यांनी मागील कठीण काळात आधी विलासराव देशमुख आणि मग अशोक चव्हाण या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी या बँकेला मोठा दिलासा दिल्याचे सांगत पुढील काळात या बँकेस गतवैभव प्राप्त होईल, असा विश्वास गुरुवारी वार्ताहर बैठकीमध्ये व्यक्त केला.

जिल्हा बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपलेली आहे. दुसर्‍या बाजूला आगामी पंचवार्षिक निवडणूक घेण्याची तयारी सहकार विभागाकडून सुरू झालेली असतानाच गेल्या आर्थिक वर्षात बँकेने बजावलेल्या चांगल्या कामगिरीची माहिती देण्याच्या निमित्ताने खतगावकर यांनी खा.चव्हाण यांची प्रशंसा करून आगामी निवडणुकीत त्यांच्यासोबत राहण्याचे संकेत दिल्याचे मानले जात आहे.

गेल्या आर्थिक वर्षात जिल्हा बँकेला ५३ कोटी ७५ लाखांचा ढोबळ नफा झाला. त्यात वेगवेगळ्या तरतुदी केल्यानंतर निव्वळ नफा ७ कोटी ३२ लाख असल्याचे अध्यक्षांनी सांगितले. १० वर्षांपूर्वी लोकनियुक्त प्रतिनिधींच्या हाती बँकेचा कारभार आल्यानंतर राज्य शासनाकडून थकहमीचे २५ कोटी तसेच इतर वेगवेगळ्या संस्थांकडील मोठी रक्कम वसूल झाल्यामुळे त्याआधीच्या वर्षात बँकेचा संचित तोटा भरून निघाला होता. आता ही बँक पूर्णतः तोटा मुक्त असल्याचे खतगावकर यांनी स्पष्ट केले. बँकेच्या ६३ शाखांपैकी ५८ शाखा नफ्यात, तर केवळ ५ शाखा तोट्यात आहेत. या शाखांना नफ्यात आणण्यासाठी संचालक मंडळाने उपाय योजिल्याचे त्यांनी सांगितले.

कोणत्याही कंपनीला परीक्षेचे आदेश दिलेच नव्हते

नोकरभरती प्रकरणात संचालक मंडळाची बदनामी झाल्याबद्दल बोलताना खतगावकर म्हणाले, बँकेच्या नोकरभरतीसाठी तीन एजन्सीजमार्फत कोटेशन मागविण्यात आले होते; परंतु यापैकी एकाही कंपनीला परीक्षा घेण्याचे आदेश बँकेने दिले नव्हते. वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांमुळे शासनाने ही भरती प्रक्रिया रद्द केली. आ.राजेश पवार यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला असला, तरी त्यांच्यामुळे भरती रद्द झाली असे म्हणणे चुकीचे असून शासनाने वृत्तपत्रांतील बातम्यांची दखल घेतल्यानेच भरती प्रक्रियेला स्थगिती मिळाल्याचे एका प्रश्नाच्या उत्तरात खतगावकर यांनी स्पष्ट केले.