नांदेड : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नांदेडच्या एका शिष्टमंडळासमोर प्रस्तावित महसूल आयुक्तालयाच्या  मागणीवर नकारघंटा वाजवल्यानंतर माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी पवार यांना सोमवारच्या भेटीत दिलेल्या निवेदनात वरील मागणीला शेवटचे स्थान देण्यात आले. इतर महत्त्वाच्या कामांच्या मागण्याही त्यांनी या भेटीमध्ये केल्या.

खतगावकर, त्यांच्या स्नुषा डॉ.मीनल पाटील, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा आणि त्यांच्या अनेक समर्थकांनी गेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर प्रथमच खतगावकर यांनी मुंबईला जात उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. गेल्या महिन्यातच आ.प्रताप पाटील चिखलीकर यांनी उपमुख्यमंत्र्यांना आयुक्तालयासंदर्भात स्वतंत्र निवेदन दिले तेव्हा या मागणीला त्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या होत्या.

उपमुख्यमंत्री पवार पुढील आठवड्यात नांदेड जिल्ह्याच्या दौर्‍यावर पक्षप्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने येणार आहेत. त्यांच्या या दौर्‍याची तयारी सुरू झालेली असतानाच खतगावकर आणि पोकर्णा यांनी सोमवारी त्यांची भेट घेतली. या भेटीमध्ये खतगावकर यांनी लेंडी धरणाचे काम प्राधान्याने पूर्ण करणे, मानार धरणाच्या कालव्यांवर सिमेंट काँक्रीटच्या अस्तरीकरणाचे काम मंजूर करणे, कोलंबी उपसा जलसिंचन योजना मूळ आराखड्याप्रमाणे मंजूर करण्यात यावे इत्यादी मागण्या मांडतानाच गोदावरी मनार सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची विनंती खतगावकर यांनी केली.

वरील भेटीबद्दल खुद्द उपमुख्यमंत्र्यांनी फेसबुकच्या माध्यमातून सर्वांना अवगत केले. खतगावकर यांनी निदर्शनास आणून दिलेली विकासकामे मार्गी लावली जातील तसेच ती वेळेत पूर्ण केली जातील, असे त्यांनी जाहीर केले. मागील आठवड्यातील नांदेड दौर्‍यात पुष्पगुच्छाऐवजी पुस्तके देत चला, असे कार्यकर्त्यांना दटावणार्‍या पवार यांनी सोमवारी त्यांना भेटलेल्या नांदेडच्या शिष्टमंडळांकडून मात्र त्यांनी पुष्पगुच्छ स्वीकारला.