गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा असलेल्या राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला अखेर पोलिसांनी परवानगी दिली आहे. या सभेसाठी औरंगाबाद पोलिसांनी १६ अटी घातल्या आहेत. त्यामध्ये इतर अनेक अटींसोबतच जातीभेद वाढवणारी वक्तव्य करू नयेत, अशी देखील अट घालण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर १ मे रोजी महाराष्ट्र दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा होणार हे आता निश्चित झालं आहे. मात्र, ही सभा उधळून लावण्याचा इशारा भीम आर्मीनं दिला आहे. परवानगी मिळण्याआधीही असा  इशारा देण्यात आला होता. मात्र, आता परवानगी मिळाल्यानंतर पुन्हा एकदा इशारा देण्यात आला आहे.

राज ठाकरेंच्या सभेला आज परवानगी देण्यात आली असून दुपारी ३.३० ते रात्री ९.४५ या कालावधीमध्येच सभेचं आयोजन करण्याची अट घालण्यात आली आहे. त्यासोबतच, सभेमध्ये वंश, जात, धर्म, भाषा, प्रदेशावरून चिथावणी देणारं वक्तव्य करू नये असं देखील नमूद करण्यात आलं आहे. याशिवाय, सभेसाठी १५ हजार लोकांपेक्षा जास्त लोकांना निमंत्रित करता येणार नाही, असं देखील परवानगीपत्रात दिलेल्या अटीमध्ये म्हटलं आहे.

राज ठाकरेंनी मनसेच्या पाडवा मेळाव्यामध्ये आणि त्यानंतर ठाण्यात घेतलेल्या उत्तर सभेमध्ये राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबद घेतलेल्या भूमिकेवरून वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर हे घटनाबाह्य असल्याचं सांगत भीम आर्मीनं सभा उधळून लावण्याचा इशारा दिला होता. त्यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी “भीम आर्मी कोण आहे? सभेच्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था कशी राखायची हे पोलीस बघतील”, असं प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळाल्यानंतर पुन्हा एकदा भीम आर्मीनं इशारा दिला आहे.

राज ठाकरेंच्या सभेला घातलेल्या अटी मनसे पाळणार का? बाळा नांदगावकर म्हणतात, “येणाऱ्या लोकांना तुम्ही…!”

“आमचा कोणत्याही व्यक्तीला विरोध नाही”

“१ तारखेला राज ठाकरेंची औरंगाबादमध्ये सभा आहे. ती सभा उधळून लावू या भूमिकेवर आम्ही आजही ठाम आहोत. कालच आम्हाला कळलं की राज ठाकरेंच्या सभेला पोलिसांनी परवानगी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या १६ अटींचं जर राज ठाकरेंनी उल्लंघन केलं, तर त्याच सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या महापुरुषांच्या घोषणा तुम्हाला ऐकायला मिळतील. आम्ही कुठल्याही व्यक्तीच्या विरुद्ध नाही. पण जो भारताच्या संविधानाच्या विरुद्ध वागेल, त्याच्याविरुद्ध आम्ही आहोत”, असं भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

“अटींचं पालन केलं जाईल”

दरम्यान, पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर अटींचं मनसेकडून पालन केलं जाईल, अशी भूमिका बाळा नांदगावकर यांनी मांडली आहे. “आयुक्तांनी जी परवानगी दिली आहे, त्याबद्दल आम्हाला सगळ्यांना मनापासून आनंद झाला आहे. पोलीस आयुक्तांना आम्ही सांगितलं आहे की त्यांनी घातलेल्या अटींचं नक्कीच पालन केलं जाईल. कायदा-सुव्यवस्था राखणं तुमच्याप्रमाणेच आमचं देखील कर्तव्य आहे. ते नक्कीच पाळलं जाईल”, असं ते म्हणाले आहेत.