कर्जत : भीमाशंकरचा सदाहरित परिसर म्हणजे सुखानुभूती. घनदाट वृक्षराजींची निश्चलता भंग करणारी प्राणीपक्ष्यांची लगबगही त्या निवांत शांततेचा भाग. पण गेल्या काही दिवसांपासून या निवांतपणाची जागा अस्वस्थतेने घेतली आहे. वृक्षतोड रोखण्यासाठी धावाधाव करत असलेले सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, स्थानिक ग्रामस्थ, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठीचा पोलीस बंदोबस्त आणि तिथेच पडलेले निष्प्राण वृक्षांचे अवशेष यांनी हा परिसर संघर्षस्थळ बनला आहे.

पाली तर्फे कोतल खलाटी गावात सध्या पर्यावरणवादी कार्यकर्ते, वन्यजीव अभ्यासक, सामाजिक संघटना आणि राजकीय नेत्यांची वर्दळ वाढली आहे. निमित्त ठरले ते टोरंट पॉवर प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीचे. केंद्र सरकारने याठिकाणी तीन हजार मेगावॅट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पाला मंजुरी दिली. प्रकल्पासाठी गावालगतच्या परिसरातील २३३ हेक्टर वनजमीन प्रस्तावित प्रकल्पासाठी दिली असून येथील ३२,४९० वृक्षांची कत्तल करण्यास अनूमती दिली. कंपनी प्रशासनाने जवळपास अडीच हजार झाडांची कत्तल केली आहे.

मोहवाडीत येथे राहणारे जयराम पवार यांचा उदरनिर्वाहच या जंगलातील संपदेवर चालतो.  जंगलाबरोबर आम्हालाही येथून हद्दपार केले जाईल, अशी भीती ते व्यक्त करतात. जंगलात राज्यप्राणी म्हणून घोषित करण्यात आलेल्या शेखरूचा अधिवास मोठ्या प्रमाणात आहे. मोर, भेकर, बिबटे, चितळ, रानडुक्कर आणि गवे यांचाही वावर आहे. वृक्षतोडीमुळे हे प्राणीपक्षीही बेघर होण्याची भीती आहे.

वृक्षतोड झालेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आणि वनकर्मचारी आणि अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. मात्र प्रकल्पाबाबत आणि वृक्षतोडीबाबत वनअधिकारी उघडपणे काहीही बोलत नाहीत. पण प्रकल्पाचा दबाव असल्याचे तेही खासगीत कबूल करतात.

‘अडीच लाख वृक्षतोडीचा डाव’

* कागदोपत्री प्रकल्पासाठी ४८ हजार झाडांची कत्तल होणार असल्याचे सांगितले जात असले तरी जवळपास अडीच लाख झाडांची कत्तल केली जाणार असल्याचा दावा कर्जतच्या पर्यावरण बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. कैलास मोरे यांनी केला आहे.

* ‘पश्चिम घाटातील जैवविविधतेने नटलेला समृद्ध परिसर प्रकल्पाच्या नावाखाली ९० टक्के लोकांनी विरोध करूनही घाई घाईने पुढे रेटला जात आहे. प्रकल्प पर्यावरणपूरक असल्याचा दावा सरकारकडून केला जात असला तरी जैवविविधतेवर प्रकल्पामुळे होणारा आघात भरून निघू शकत नाही,’ असे ते म्हणाले.

कारवीचे अस्तित्व धोक्यात

कर्जतमधील जंगलात कारवी ही औषधी वनस्पती मुबलक प्रमाणात आढळते, जी डोंगर उतारावर वाढते. वृक्षतोडीमुळे  या औषधी वनस्पतीचे अस्तित्वही धोक्यात येणार असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात.