Bhiwandi Bakra Eid Celebration Viral Video: मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ‘ईद-उल-अजहा’ अर्थात बकरी ईद आज भिवंडी शहरात मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. एकीकडे शहरात सणाचा आनंद असतानाच, दुसरीकडे मध्यरात्री कुर्बानीसाठी आणलेला एक रेडा सुटल्याने परिसरात काही काळ चांगलाच गोंधळ उडाला होता. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
मध्यरात्री रेडा सुटल्याने उडाली धावपळ
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर भिवंडीत मोठ्या प्रमाणावर बोकड आणि रेड्यांची खरेदी-विक्री केली जाते. अशातच, कुर्बानीसाठी दावणीला बांधून ठेवलेला एक रेडा मध्यरात्रीच्या सुमारास अचानक दोर तोडून पळाला. रेडा रस्त्यावरून भरधाव पळत सुटल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
मालक किरकोळ जखमी
व्हायरल व्हिडिओमध्ये रेड्याला पकडण्यासाठी नागरिकांची मोठी धावपळ उडाल्याचे दिसत आहे. यादरम्यान नियंत्रण सुटलेल्या रेड्याने आपल्या मालकालाच पायदळी तुडवले, ज्यात मालक किरकोळ जखमी झाला. सुदैवाने, या संपूर्ण घटनेत कोणतीही मोठी जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नाही. शेवटी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात या रेड्याला पकडण्यात यश आले. भिवंडीत ईदच्या काळात अशा प्रकारच्या घटना नवीन नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. यापूर्वीही अनेकदा सुटलेल्या जनावरांनी धुमाकूळ घातल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
मशिदींमध्ये सामूहिक नमाज; सलोख्यासाठी प्रार्थना
हा किरकोळ गोंधळ सोडल्यास, भिवंडी शहरात पहाटेपासूनच ईदचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. नवीन कपडे परिधान करून मुस्लिम बांधव मशिदींमध्ये नमाज पठणासाठी दाखल झाले होते. शहरातील शांतिनगर, धामणकर नाका, जामा मशिद आणि कोटरगेट परिसरातील मशिदींमध्ये सामूहिक नमाज अदा करण्यात आली. कोटरगेट मशिदीत ईदची शेवटची नमाज पार पडली, जिथे अलोट गर्दी पाहायला मिळाली. नमाजानंतर देशात शांतता, सौहार्द, समृद्धी आणि बंधुभाव कायम राहावा यासाठी विशेष दुआ (प्रार्थना) करण्यात आली. नमाज संपन्न झाल्यानंतर नागरिकांनी एकमेकांना गळाभेट देत ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छा दिल्या.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
भिवंडी हे संवेदनशील शहर मानले जात असल्याने, सणाच्या काळात शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनातर्फे विशेष काळजी घेण्यात आली होती. शहरातील मुख्य चौक आणि संवेदनशील भागांत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कायदा व सुव्यवस्थेचे पालन करत भिवंडीकरांनी हा सण शांततेत आणि उत्साहात साजरा केला.
कल्याणमध्ये बकरी ईदपूर्वी तणाव; गृहनिर्माण संकुलात कुर्बानीला मनाई
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमेतील ‘सर्वोदय सृष्टी सागर कॉम्प्लेक्स’मध्ये बकऱ्यांच्या कुर्बानीवरून वाद निर्माण झाला आहे. कॉम्प्लेक्समध्ये कुर्बाणी देण्यास पोलीस प्रशासन आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने मनाई केल्याचा आरोप काही नागरिकांनी केला आहे.
या निर्णयामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी कॉम्प्लेक्स परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. सध्या या वादावर तोडगा काढण्यासाठी नागरिक आणि प्रशासनात चर्चा सुरू असून, सर्वांचे लक्ष पुढील निर्णयाकडे लागले आहे.
