नांदेड : गेल्या वर्षीच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीस सहा महिने उलटल्यानंतर जिल्ह्यातील भोकर मतदारसंघ प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमेदवाराची माघार आणि नंतर त्याने केलेला भाजपचा प्रचार एका ध्वनिफितीमुळे चर्चेमध्ये आला आहे. १५ वर्षांपूर्वी हाच मतदारसंघ ‘पेड न्यूज’ प्रकरणामुळे राज्यातच नव्हे, तर देशभर गाजला होता. भाजप खासदार अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. देशभरातील मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर २००९ पासून झालेल्या निवडणुकांत या मतदारसंघाचा ‘सात-बारा’ चव्हाण परिवाराच्या नावावर असून, पूर्वीच्या भोकर-उमरी-धर्माबाद या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांनी दीर्घकाळ केले होते. त्यांच्या कारकिर्दीत या मतदारसंघातील १९७८ची निवडणूक राज्यभर गाजली. तेव्हाच्या अग्रणी समाजवादी नेत्यांनी शंकररावांना मदत केली होती. नरहर कुरुंदकरांनीही त्यांच्यासाठी सभा घेतल्या होत्या.

२००९ ते २०१९ दरम्यानच्या तीन निवडणुकांत अशोक व अमिता चव्हाण या दाम्पत्याने भोकर मतदारसंघावर काँग्रेसचा झेंडा फडकविला. २०२४च्या आरंभी चव्हाण भाजपत गेले. विधानसभेसाठी त्यांची कन्या श्रीजया हिला या पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यानंतर तिला निवडून आणण्यासाठी वेगवेगळे उपाय योजतानाच चव्हाण यांना आपली ‘राजकीय’ प्रतिष्ठा पणाला लावावी लागली होती. त्यांच्या कन्येचा ५० हजारांहून अधिक मतांनी विजय झाला, तरी या निवडणुकीतून माघार घेणाऱ्यांतील नामदेव आयलवाड यांची माघार एका ध्वनिफितीमुळे सहा महिन्यांनंतर आता गाजत आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाचे भोकर तालुकाध्यक्ष ॲड. शेखर कुंटे आणि या पक्षाचे निवडणुकीतील उमेदवार आयलवाड यांच्यातील तेव्हाची एक ध्वनिफीत सर्वत्र फैलावल्यानंतर ॲड. कुंटे यांनी, तिची सत्यता मान्य करून काही बाबी समोर आणल्या आहेत. आयलवाड यांच्या माघारीसाठी ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी अर्थपूर्ण भूमिका बजावल्याचा आरोप कुंटे यांनी केला. आयलवाड यांनी, हाके यांच्या दबावामुळे माघार घ्यावी लागल्याचे तेव्हा सांगितले होते. पण हाके यांनी त्याचा इन्कार केला होता. आज आयलवाड हे हाके यांच्या संपर्कात आहेत आणि दुसरीकडे ते भाजपवासी झालेले आहेत, याकडे कुंटे यांनी लक्ष वेधले. आयलवाड यांच्या माघारीच्या संदर्भाने आपण न्यायालयीन कारवाई करत आहोत, असेही कुंटे यांनी सांगितले.

या निमित्ताने विधानसभा निवडणुकीत भोकर मतदारसंघात दाखल झालेल्या विक्रमी अर्जांची माहितीही समोर आली. निवडणुकीत १३४ जणांनी अर्ज भरला होता. त्यांतील ४३ अर्ज छाननी प्रक्रियेत बाद झाले. उरलेल्या ९१पैकी तब्बल ६६ उमेदवारांनी माघार घेतली. माघारीसाठी भाजपकडून वेगवेगळ्या माध्यमांतून प्रयत्न झाले होते. वंचित बहुजन आघाडीच्या सुरेश राठोड यांच्यावरही मोठा दबाव आला होता; पण ते निवडणुकीत शेवटपर्यंत राहिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत याच मतदारसंघात अशोक चव्हाण विरुद्ध डॉ. माधव किन्हाळकर अशी लढत झाली होती. तेव्हा मुख्यमंत्री असलेल्या चव्हाण यांनी डॉ. किन्हाळकर यांचा लाखांहून अधिक मतांनी पराभव केला आणि ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. पण याच कालखंडात त्यांना निवडणुकीतील ‘पेड न्यूज’ प्रकरणावरून डॉ. किन्हाळकर यांनी उच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगासमोरील कायदेशीर लढाईमध्ये खेचले होते. या लढाईमध्ये ‘पेड न्यूज’चा मुद्दा कायद्याच्या कसोटीवर टिकला नाही; पण चव्हाण यांच्या निवडणूक खर्चाच्या लेख्यांमध्ये काही खर्च नमूद केले नसल्याची बाब निवडणूक आयोगाच्या छाननीमध्ये स्पष्ट झाली. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयासह दिल्ली उच्च न्यायालयातही चालले.