राहाता:समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या राहाता शहरातील शाखेत बोगस खाती उघडून आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी भोंदू अशोक खरात याला शिर्डी पोलिसांनी अटक केली. खरातला आज, शनिवारी न्यायालयाने ७ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती ‘एसआयटी’चे तपास अधिकारी तथा शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी दिली.

अशोक खरात नाशिक कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. दिनेश परब यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राहाता पोलीसांनी अशोक खरातविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे. समता पतसंस्थेच्या राहाता शाखेत १०० बनावट खात्यांच्या गाजलेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मुख्य आरोपी अशोक खरात याला नाशिक ‘एसआयटी’ने पुन्हा काल शुक्रवारी रात्री शिर्डी पोलिसांच्या स्वाधीन केले.

यापूर्वी शिर्डीतील जमीन खरेदी प्रकरणात झालेल्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. राहाता येथील समता पतसंस्थेत ५७ व्यक्तींच्या नावावर १०० बनावट खाती उघडण्यात आली होती. विशेष म्हणजे या सर्व खात्यांमध्ये अशोक खरात याचेच नाव वारसदार म्हणून नोंदविण्यात आले होते. या खात्यांमधून कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. शिर्डी पोलिसांनी संबंधित खातेदारांची चौकशी केली असता, सर्वांनी आपण कोणतेही खाते उघडले नसल्याचे स्पष्ट सांगितले. त्यामुळे बनावट कागदपत्रांच्या आधारे ही खाती उघडल्याचा पोलीसांचा संशय अधिकच बळावला.

शिर्डीतील जमीन प्रकरणात चौकशी पूर्ण झाल्यानंतर अशोक खरातला पुन्हा नाशिक ‘एसआयटी’च्या ताब्यात देण्यात आले होते. त्यानंतर समता पतसंस्थेतील १०० बनावट खातेप्रकरणाच्या तपासासाठी शिर्डीच्या ‘एसआयटी’ने त्याचा ताबा घेतला आहे. काल रात्री त्याला नाशिकहून शिर्डी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. राहाता ग्रामीण रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. आज अशोक खरातला राहाता न्यायालयात हजर असता त्याला न्यायालयाने ७ आँगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा तपास एसआयटीचे अधिकारी तथा शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती करीत आहेत.

अशोक खरातला पुन्हा पोलिस कोठडी मिळाल्याने समता पतसंस्थेतील कथित आर्थिक गैरव्यवहाराचा तपास निर्णायक टप्प्यात पोहोचण्याची शक्यता आहे. बनावट खाती नेमकी कशासाठी उघडण्यात आली. या व्यवहारांचा प्रत्यक्ष लाभ कोणाला झाला. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग होता आणि या आर्थिक गैरव्यवहाराचे धागेदोरे इतर कोणत्या प्रकरणांशी जोडलेले आहेत का, याचा उलगडा पुढील चौकशीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.