रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात मंगळवारी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट घाटातील संरक्षण भिंतीवर आदळला. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की धडकेनंतर ट्रकचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला असून वाहन अर्धवट लटकलेल्या अवस्थेत आढळून आले.

या अपघातात ट्रकमधून प्रवास करणारे दोघेजण गंभीर जखमी झाले. धडकेनंतर चालकासह एक जण ट्रकमध्येच अडकून पडले होते. महामार्गावरून जाणाऱ्या इतर वाहनचालकांनी व प्रवाशांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. मदत ग्रूपचे प्रसाद गांधी यांनीही तातडीने घटनास्थळी पोहोचून जखमींना बाहेर काढण्याचे कार्य केले.घटनेची माहिती मिळताच मदत ग्रुप तसेच जगद्गुरु श्री नरेंद्राचार्य महाराज संस्थेची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली.

जखमींना प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. पोलिसांनीही त्वरित घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.दरम्यान, अपघातग्रस्त कंटेनर ट्रकमध्ये ‘थम्सअप’ कंपनीचे शीतपेय असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांकडून अपघाताची पुढील चौकशी सुरू आहे.