छत्रपती संभाजीनगर : औद्योगिक जगतातील राज्यात सर्वाधिक एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकची गुंतवणूक असणाऱ्या बिडकीन परिसरात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मतदारांनी भाजपची पाटी कोरी ठेवली. पैठण तालुक्यात एकाही गटात भाजपचा उमदेवार निवडून आला नाही. विशेष म्हणजे पैठण तालुक्यातील बिडकीन गटात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार मनोज पेरे यांना मतदारांनी निवडून दिले.
पैठण विधानसभा मतदारसंघातील नऊ गटापैकी आठ ठिकाणी शिवसेनेचे तर एक शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार निवडून आला. संपूर्ण तालुक्यात कमळ फुललेच नाही. पैठण तालुक्यात शिवसेनेसोबत (एकनाथ शिंदे) युती करण्यावरून अखेरच्या क्षणापर्यंत भाजपने घातलेला घोळ त्यांना भोवल्याचे निकालातून स्पष्ट झाले.
पैठण तालुक्यावर शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) खासदार संदिपान भुमरे व त्यांचे चिरंजीव आमदार विलास भुमरे यांचे वर्चस्व असून, नऊ पैकी आठ गटामध्ये शिवसेनेचेच (एकनाथ शिंदे) उमेदवार निवडून आले. तर एका जागेवरही शिवसेनेचाच (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार निवडून आला असून, भाजपची पाटी मात्र, कोरी राहिली आहे. भाजपकडून प्रत्येक कार्यक्रमात गुंतवणूक आणल्याचे सांगताना बिडकीनचे उदाहरण दिले जाते. बिडकीनमध्ये सुमारे आठ हजार एकरावरील औद्योगिक वसाहतीमध्ये टोएटा, जेएसडब्ल्यू, एथर, परॅमल, लुब्रीझॉल अशा नामांकित कंपन्या आल्या आहेत. मात्र, स्थानिक लोक भाजपला प्राधान्य देत नसल्याचे दिसून येत आहे.
भाजपच्या उमेदवारांना एबी फाॅर्म न मिळाल्याने त्यांना अपक्ष म्हणून मिळेल त्या चिन्हावर लढावे लागले. भाजपच्या कमळ चिन्हावर लढलेले एकमेव उमेदवार विजय चव्हाण यांनाही पराभवाचे तोंड पाहावे लागले. सर्वाधिक विजयाची चर्चा होत आहे ती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार मनोज पेरे यांची. बिडकीन गटातून मनोज पेरे यांचा विजय सुकर होण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे लतीफ कुरेशी यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने. कुरेशी यांच्या माघारीमुळे मनोज पेरे यांच्याकडे मुस्लिम मते वळल्याची चर्चा आहे. बिडकीन गटामध्ये ९ ते १० गावांचा समावेश असून, एकूण २९ हजार मतदार आहेत. पैकी ७ फेब्रुवारी रोजी २३ हजार मतदान झाले आहे. ज्या भागात गुंतवणूक त्या भागात भाजपचा लोकप्रतिनिधी नसणे, याकडे स्थानिक नेत्यांनीही लक्ष दिले नसल्याचे दिसून येत आहे.
विकास हा निवडणुकीचा आधार असल्याचे भाजपकडून वारंवार सांगितले जाते. मात्र, ज्या भागात विकास दिसतो आहे, त्या गावांमध्ये भाजप ऐवजी शिवसेनेवर प्रेम करणारेच मतदार अधिक असल्याचे चित्र बिडकीन गटाच्या निवडणुकीतून पुढे आले आहे.
