मुंबई : अवकाळी, अतिवृष्टीमुळे कांदा रोपांचे नुकसान झाल्यामुळे पहिल्या टप्प्यात कांदा लागवड रखडली होती. त्यानंतर रोपांची उपलब्धता वाढल्यामुळे नाशिक परिसरात अखेरच्या टप्प्यापर्यंत लागवडी सुरू आहेत. दोन फेब्रुवारीपर्यंत ४ लाख ९१ हजार ९२२ हेक्टरवर लागवड झाली आहे. राज्यातील रब्बी हंगामातील सरासरीक्षेत्र ५.५० लाख हेक्टर आहे. सरासरीच्या तुलनेत ५० हजार हेक्टरने कांदा लागवड क्षेत्रात घट होण्याचा अंदाज आहे.
रब्बी हंगामातील (उन्हाळी) कांदा लागवड ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत केली जाते. चांगल्या उत्पादनासाठी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून डिसेंबरच्या सुरुवातीपर्यंतचा काळ सर्वोत्तम मानला जातो. पण, अलिकडे फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत लागवड केली जाते. यंदा कांदा लागवड हंगामाच्या सुरुवातीच्या टप्प्यात अवकाळी, अतिवृष्टीमुळे कांदा रोपांचे नुकसान झाले. त्यामुळे पहिल्या टप्प्यात कांदा लागवड रखडली होती. मात्र, शेतकऱ्यांनी दोन, तीन वेळा रोपे टाकल्यामुळे लागवडीसाठी रोपांची उपलब्धता वाढली. तसेच यंदाच्या पावसाळ्यात झालेल्या दमदार पावसामुळे सिंचनासाठी पाण्याची उपलब्धताही चांगली असल्यामुळे नाशिक परिसरात अखेरच्या टप्प्यापर्यंत लागवडी सुरू आहेत. कांदा पीक १२० दिवसांत काढणीला येते, त्यामुळे सिंचनाची सोय असलेल्या ठिकाणी फेब्रुवारीच्या पंधरा तारखेपर्यंत लागवडी होतात.
कृषी विभागाच्या माहितीनुसार, यंदा दोन फेब्रुवारीपर्यंत ४ लाख ९१ हजार ९२२ हेक्टरवर लागवड झाली आहे. राज्यातील रब्बी हंगामातील सरासरीक्षेत्र ५.५० लाख हेक्टर आहे. लागवडीचा मुख्य हंगाम संपला आहे. यापुढे तुरळक ठिकाणी लागवड होईल, त्यामुळे सरासरीच्या तुलनेत ५० हजार हेक्टरने कांदा लागवड क्षेत्रात घट होण्याचा अंदाज आहे.
ग्राहकांना अपेक्षित पुरवठा होणार
रब्बी हंगामातील सरासरी क्षेत्र ५.५० लाख हेक्टर आहे. कृषी विभागाच्या इतिहासात २०२४-२५ मध्ये ६.५२ लाख हेक्टरवर लागवड झाली होती. यंदा पन्नास हजार हेक्टरने घट होण्याचा अंदाज असला तरीही राज्यासह देशात कांद्याचा तुटवडा जाणविणार आहे. देशाला एका वर्षाला सरासरी २०० लाख टन कांद्याची गरज असते. मात्र, देशात खरीप, उशिराचा खरीप आणि रब्बी, अशा तीन हंगामात कांदा उत्पादन होते. त्यामुळे गरजेपेक्षा सुमारे १०० टन जास्त म्हणजे सरासरी ३०० लाख टन कांदा उत्पादन होते. त्यामुळे ग्राहकांना कांद्याचा तुटवडा जाणविणार नाही.
लागवड सरासरी इतकी होणार
दमदार पावसामुळे सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता चांगली आहे. त्यामुळे अखेरच्या टप्प्यापर्यंत लागवडी होत आहेत. फेब्रुवारी मध्यापर्यंत सरासरी इतका म्हणजे ५.५० लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड होईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली.

