शिवसेनेतील बंडखोरीनंतर हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात गेलं. यात पक्ष आणि पक्षचिन्ह कुणाचं इथपासून तर बंडखोर आमदार कोण आणि त्यांच्यावर काय कारवाई करायची यावर सुनावणी सुरू आहे. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयातील या सुनावणीचं लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभाअध्यक्षांना निर्णय घेण्यास सांगितले. यानंतर आता विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी होत आहे. अशातच विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या सुनावणीबाबत मोठी मागणी केली आहे. त्यांनी याबाबत विधानसभा अध्यक्षांना पत्रही दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विजय वडेट्टीवार म्हणाले, “अपात्र आमदारांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात जेव्हा खटले चालतात त्यावेळी ते लाईव्ह सगळ्यांना बघायला मिळतं. आज महाराष्ट्रात एवढा मोठा घटनाक्रम झाला आहे. घटनातज्ज्ञही यावर गांभीर्याने लक्ष ठेऊन आहेत. महाराष्ट्राचंही या सुनावणीकडे लक्ष आहे. अशा परिस्थितीत विधानसभा अध्यक्ष जी सुनावणी करणार आहेत ती लाईव्ह करावी.”

“विधानसभा अध्यक्षांनी बंडखोर आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी लाईव्ह करावी. जेणेकरून काय चाललं आहे हे लोकांना समजेल आणि सत्य परिस्थिती समोर येईल. कोण काय बाजू मांडतोय हेही समजेल. म्हणून आम्ही या सुनावणीचं प्रक्षेपण लाईव्ह करावं अशी मागणी केली आहे,” असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.

विधानसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलं?

पत्रात विजय वडेट्टीवार म्हणाले, “महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या बंडखोरी प्रकरणी आमदारांच्या अपात्रते संदर्भात आपल्याकडे सुरू असलेल्या कार्यवाहीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील लोकशाही आणि न्यायप्रेमी जनतेचे लक्ष लागले आहे. या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयानेही अनेक महत्वपूर्ण निष्कर्ष नोंदवून आपण या प्रकरणी न्यायनिवाडा करावा असे निर्देशित केले आहे.”

“बंडखोरांवर काय कारवाई होणार हे महाराष्ट्राला कळणं आवश्यक”

“त्या अनुषंगाने बंडखोर आमदारांवर नेमकी काय कारवाई होणार हेही महाराष्ट्राला कळणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील राजकारणाच्या ढासळत्या दर्जामुळे राज्यातील नागरिकांमध्ये एकंदर राजकीय व्यवस्थेबाबत नकारात्मकता निर्माण झाली आहे. हे लोकशाहीच्या हिताचे नाही,” असं विजय वडेट्टीवारांनी म्हटलं.

“…म्हणून आमदार अपात्रतेची सुनावणी लाईव्ह करा”

ते पुढे म्हणाले, “विधानसभा अध्यक्ष या नात्याने आपण एका संवैधनिक पदावर विराजमान आहात. या प्रकरणाबाबत आपण कसा न्याय देणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलेलं आहे. या पार्श्वभूमीवर संवैधानिक संस्था, संवैधानिक पद आणि एकंदरीत लोकशाही व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचे आपण ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपण करावे.”

हेही वाचा : “अजित पवारांच्या चेहऱ्यावर अपराधीपणा आणि…”; काँग्रेस नेत्याचं वक्तव्य, म्हणाले…

“आमदार अपात्र प्रकरणाची ही सुनावणी पारदर्शक व्हावी म्हणून या सुनावणीचे लाईव्ह प्रक्षेपण करावे, ही विधानसभेचा विरोधी पक्षनेता म्हणून माझी मागणी आहे,” असंही वडेट्टीवारांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big demand by congress leader vijay wadettiwar about rebel mla disqualification pbs
Show comments