महाराष्ट्र सरकारने राज्यातील गरीब महिलांसाठी लाडकी बहीण योजनेची सुरुवात २०२४ मध्ये केली. या योजनेचा लाभ राज्यातील लाखो महिलांना मिळतो आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते. दारिद्य्र रेषेखालील पात्र महिलांना या योजनेमुळे मोठा फायदा झाला आहे.
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी बंधनकारक
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी लाडक्या बहिणींना वेळोवेळी eKYC करावी लागते. राज्य सरकारने ईकेवायसी करण्यासाठी ३१ डिसेंबर ही शेवटची तारीख दिली होती. मात्र अनेक महिलांची ईकेवायसी करताना चुकीचा पर्याय निवडला होता. त्यामुळे या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती. आता अशा महिलांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.
काय आहे आदिती तटकरेंची पोस्ट?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना : महत्वाची सूचना !
महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी पर्यंत e-KYC करण्याची मुदत देण्यात आली होती. तथापि, काही कारणास्तव e-KYC करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हणूनच, योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी (Physical Verification) करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. अशी पोस्ट आदिती तटकरेंनी केली आहे.
वाशिम जिल्ह्यात अनेक लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणे बंद झाल्याचं चित्र आहे. त्यासंबंधी तक्रार करायला गेलेल्या महिलांचा संताप पाहण्यास मिळाला होता. लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत नसल्याबाबत तक्रार मांडण्यासाठी मोठ्या संख्येने महिला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या होत्या. मात्र जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट नाकारण्यात आल्याचा आरोप महिलांनी केला. वारंवार विनंती करूनही जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश न मिळाल्याने संतप्त महिलांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या सरकारी वाहनाला घेराव घालत जोरदार निषेध व्यक्त केला. यानंतर आता आदिती तटकरेंनी पोस्ट लिहून महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
काय आहे लाडकी बहीण योजना ?
महाराष्ट्र सरकारने जुलै २०२४ मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात सुरू केली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. योजनेअंतर्गत या महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यात येतात. हे पैसे थेट महिलांच्या खात्यात जमा होतात. महिलांना आर्थिक मदत मिळावी, त्यांचा घर खर्च चालावा या हेतूने ही रक्कम दिली जात आहे.
