नांदेड जिल्ह्यात भाजपाला खिंडार, ‘या’ माजी मंत्र्याचा राजीनामा, काँग्रेस प्रवेशाची घोषणा

नांदेड जिल्ह्यात भाजपाला खिंडार पडलंय. देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीपूर्वीच भाजपातील दुफळी उघड झालीय. भाजपाच्या एका माजी मंत्री व ज्येष्ठ नेत्यासह माजी आमदार आणि अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देत काँग्रेस प्रवेशाची घोषणा केलीय.

भाजपाला सोडचिट्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेशाची घोषणा करणारे नांदेडचे नेते (फोटो : नरेंद्र गडप्पा)

नांदेड जिल्ह्यात भाजपाला खिंडार पडलंय. देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीपूर्वीच भाजपातील दुफळी उघड झालीय. माजी मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर यांनी भाजपाला सोडचिट्ठी देत काँग्रेस प्रवेशाची घोषणा केलीय. त्यांनी माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्यासह भारतीय जनता पार्टीतील अनेक पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे दिलेत.

तिकीट वाटपावरून नाराजी

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये सुभाष साबणे यांना उमेदवारी दिल्याने जेष्ठ नेते भास्करराव खतगावकर नाराज होते. अखेर त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे रविवारी (१७ ऑक्टोबर) जाहीर केले.

आधी दाढदुखीचं कारण देत सभांना दांडी

गेल्या काही दिवसांपासून खतगावकर भाजप नेत्यांवर नाराज होते. सुभाष साबणे यांना उमेदवारी दिल्यानंतर होणाऱ्या प्रचार सभांना विविध कारणे देऊन खतगावकरांनी जाणे टाळले होते. पहिल्या सभेला दाढदुखीचे कारण देत खतगावकर सभेला गैरहजर राहिले. त्यानंतर आता ते काँग्रेसमध्ये जात असल्याचं स्पष्ट झालं. त्यांचा वेगळा विचार सुरू असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ ने प्रकाशित केले होते.

खासदार, मंत्री राहिलेले खतगावकर काँग्रेस प्रवेश करणार

रविवारी (१७ ऑक्टोबर) खतगावकरांनी भाजपाला रामराम करीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. खतगावकर हे खासदार, मंत्री राहिले होते. ते भाजपामध्ये आले होते तेव्हा काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या विरोधात वातावरण निर्माण होईल आणि त्याचा फायदा होईल असा भाजप नेत्यांचा अंदाज लोकसभा निवडणुकीमध्ये खरा ठरला होता.

हेही वाचा : देगलूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर! ३० तारखेला होणार मतदान

लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण पराभूत झाले. त्यानंतर निवडून आलेले खासदार प्रताप पाटील चिखलीकर हेच जिल्ह्याच्या भाजपमधील नियुक्तीत अग्रेसर दिसले. सुभाष साबणे यांना उमेदवारी मिळवून देण्यातही त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. परिणामी नाराज झालेल्या खतगावकर यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे जाहीर केले आहे.

भाजप प्रवेशाची सप्तवर्षपूर्ती अलीकडेच झाल्यानंतर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी रविवारी (१७ ऑक्टोबर) काही प्रमुख समर्थकांसह या पक्षाला रामराम ठोकला. पक्ष सोडत असताना त्यांनी जिल्हा भाजपत एकाधिकारशाही गाजविणार्‍या खासदार प्रताप पाटील चिखलीकरांवर निशाणा साधला.

खतगावकर यांच्या हातातील ‘कमळाचे फूल’ मांजरा-लेंडी नदीपात्रात

भास्करराव यांचा देगलूर-बिलोली या २ तालुक्यांत मोठा प्रभाव असून तेथे विधानसभा निवडणुकीच्या पोटनिवडणुकीत भाजपने मोठी शक्‍ती लावली आहे; पण गेले १०-१२ दिवस खतगावकर त्यात कोठेही सहभागी नव्हते. ते वेगळ्या पवित्र्यात असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने गेल्या आठवड्यात दिले होते. त्यानुसार रविवारी वार्ताहर बैठक घेत खतगावकर यांनी आपल्या हातातील ‘कमळाचे फूल’ मांजरा-लेंडी नदीपात्रात सोडले. माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी उपमहापौर सरजीतसिंघ गील यांनीही खतगावकरांसोबत भाजपला सोडचिठ्ठी दिली.

“भाजपाच्या प्रमुख नेत्यांवर दोषारोप करणं टाळलं”

सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी खतगावकर यांनी काँग्रेससोबतचे ४ दशकांचे संबंध तोडत भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतरच भाजपामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणावर ‘इनकमिंग’ सुरू झाले. खतगावकरांनी नांदेड जिल्ह्यात पक्षाचा विस्तार करताना दिग्गज नेत्यांनाही आणले; पण अलीकडच्या २ वर्षांत त्यांचीच पक्षात घुसमट सुरू झाली. पक्षसंघटनेची सारी सूत्रे खासदार चिखलीकर व त्यांच्या परिवारात गेल्यामुळे ज्येष्ठांमध्ये अस्वस्थता होतीच; खतगावकरांनी गेले काही दिवस अनेकांची विचारविनिमय करून पक्ष सोडण्याचा निर्णय रविवारी जाहीर केला. भाजपाच्या प्रमुख नेत्यांवर दोषारोप करण्याचे त्यांनी टाळले.

भाजपाला सोडचिठ्ठी देतानाच खतगावकर यांनी स्वगृही म्हणजे काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचे जाहीर केले. त्यांच्या काँग्रेस प्रवेशाची तारीच एक-दोन दिवसांत स्पष्ट होईल. देगलूरची पोटनिवडणूक महत्त्वाच्या टप्प्यावर आलेली असतानाच खतगावकर यांनी भाजपाला रामराम ठोकला. यामुळे खासदार चिखलीकर व त्यांच्या गटावरील दबाव वाढला आहे. सायंकाळपर्यंत भाजपातून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नव्हती.

अशोक चव्हाणांकडून स्वागत

भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भास्करराव पाटील खतगावकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची घोषणा केली यानंतर त्यांच्या या राजकीय निर्णयाचे स्वागत करतानाच काँग्रेस नेते व ज्येष्ठ मंत्री अशोक चव्हाण यांनी या निर्णयामुळे नांदेड जिल्हाच नव्हे तर मराठवाड्यातील पक्षसंघटनेला बळकटी मिळेल, अशी प्रतिक्रिया व्यक्‍त केली. चव्हाण यांनी माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा व खतगावकर यांच्या इतर सहकार्‍यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या निर्णयाचे स्वागत केले.

देशमुखांची शिष्टाई निष्फळ

भास्करराव खतगावकर भाजप सोडण्याच्या तयारीत असल्याची कुणकुण खासदार चिखलीकर यांच्यासह भाजपच्या काही पदाधिकार्‍यांना मागील आठवड्यातच लागली होती. या पार्श्वभूमीवर भाजपाचे विभागीय संघटनमंत्री भाऊराव देशमुख यांनी शनिवारी (१६ ऑक्टोबर) खतगावकर यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. आपण पक्ष सोडू नये, असे देशमुखांनी त्यांना विनवले. दोघांदरम्यान तब्बल तासभर चर्चा झाली. पण ती निष्फळ ठरल्याचे खतगावकर यांच्या रविवारच्या निर्णयानंतर स्पष्ट झाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Big shock for bjp in nanded district many leader to join congress pbs

Next Story
‘कोरा कागद निळी शाई, आम्ही कोणाला भीत नाही’!
ताज्या बातम्या