Divya Shinde Pune FIR case: ‘बिग बॉस मराठी’ची माजी स्पर्धक आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दिव्या शिंदे हिच्यासह तिच्या साथीदारांवर एका निवृत्त शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याला घरात घुसून बेदम मारहाण केल्याप्रकरणी तसेच ५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी पुणे शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ‘न्याती हाईलँड्स’ येथे गुरुवारी रात्री ही घटना घडली. या प्रकरणी डॉ. विद्याधर गायकवाड (वय ६५) यांनी शुक्रवारी काळेपडळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. द इंडियन एक्सप्रेसने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

नेमके प्रकरण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. गायकवाड हे २०२१ मध्ये पुणे कॅन्टोन्मेंट रुग्णालयातून वैद्यकीय अधिकारी म्हणून निवृत्त झाले आहेत. ते ‘करुणादीप फाउंडेशन’चे सदस्य असून या संस्थेने १ ते ३ सप्टेंबर दरम्यान बालगंधर्व रंगमंदिरात ‘कला आविष्कार महोत्सव’ आयोजित केला होता.

डॉ. गायकवाड यांचे बंधू महेंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमासाठी दिव्या शिंदे हिला अधिकृत निमंत्रण नव्हते; तरीही ती या कार्यक्रमाला उपस्थित राहिली आणि तिने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून उपस्थितांशी संवाद साधला. “माझ्यामुळेच या कार्यक्रमाला प्रसिद्धी मिळाली, असा दावा करत तिने ५ लाख रुपयांची मागणी सुरू केली. डॉ. विद्याधर यांनी तिला ‘गुगल पे’द्वारे सुमारे ५० हजार रुपये पाठवलेही होते, मात्र तरीही ती उर्वरित पैशांसाठी सातत्याने दबाव आणत होती,” असा आरोप महेंद्र यांनी केला आहे.

घरात तोडफोड, बेदम मारहाण अन् जीवे मारण्याची धमकी

एफआयआरमधील माहितीनुसार, १७ सप्टेंबर रोजी दिव्या शिंदे, अण्णा ढमढेरे व इतर काही जण डॉ. गायकवाड यांच्या मोहम्मदवाडी येथील घरी गेले आणि त्यांनी ५ लाखांची मागणी केली. त्यानंतर २३ सप्टेंबर रोजी ढमढेरे याने डॉ. गायकवाड यांना धमकी दिली की, “पैसे दिले नाहीत तर घरी माणसे पाठवून मारहाण केली जाईल.” त्यावर डॉ. गायकवाड यांनी आपण अर्धांगवायूने ग्रस्त असून संस्थेच्या आर्थिक व्यवहारांशी आपला काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते.

तरीही गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास दिव्या शिंदे आणि तिचे साथीदार डॉ. गायकवाड यांच्या घरात घुसले. त्यांनी लाकडी काठी, बेल्ट आणि पाण्याच्या तांब्याने डॉ. गायकवाड यांना बेदम मारहाण केली. घरातील वस्तूंची तोडफोड करत ५ लाख रुपये न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्या मुलालाही धमकावण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच महेंद्र यांनी पोलिसांसह घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या डॉ. गायकवाड यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

दरम्यान दिव्या शिंदे यांच्या वकिलांनी त्यांची भूमिका मांडली आहे. सदर प्रकरणात खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा दावा त्यांनी केला. यासंबंधी दिव्या शिंदेच्या इन्स्टाग्राम हँडलवर वकिलांचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

गुन्ह्यांची नोंद आणि तपास सुरू

डॉ. गायकवाड यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दिव्या शिंदे, अण्णा ढमढेरे व इतर साथीदारांविरुद्ध खुनाचा प्रयत्न, मारहाण, धमकी आणि खंडणी उकळणे यांसारख्या विविध कलमांखाली भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला आहे.

कोण आहे दिव्या शिंदे?

सोशल मीडियावर ‘सरकार’ नावाने परिचित असलेली दिव्या शिंदे ही सिंहगड रस्ता परिसरात राहते. तिच्या विविध सोशल मीडिया खात्यांवर १० लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये तिने सहभाग घेतला होता. सोसायटी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे काळेपडळ पोलिसांनी सांगितले.