मुंबई : राज्यात बाईक टॅक्सीला परवानगी देण्याच्या सरकारच्या निर्णयावरून रिक्षाचालकांच्या रोजगाराचा प्रश्न उपस्थित करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर केलेल्या टीकेला सरनाईक यांनी प्रत्युत्तर दिले आहे. बाईक टॅक्सीच्या निर्णयामागे काही मंत्र्यांचे संबंधित कंपन्यांशी आर्थिक आणि व्यावसायिक संबंध असल्याचा राऊत यांचा आरोप गंभीर असून, त्यासंदर्भातील कागदपत्रे आणि पुरावे सादर करावेत, असे आव्हान सरनाईक यांनी दिले. तसेच या विषयावर चर्चा करण्यासाठी आपण थेट त्यांच्या कार्यालयात येण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राऊत यांनी २३ ऑगस्ट रोजी सरनाईक यांना पत्र पाठवून बाईक टॅक्सीला परवानगी दिल्यास राज्यातील हजारो रिक्षाचालकांच्या रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली होती. तसेच या निर्णयामागे काही मंत्र्यांचे बाईक टॅक्सी कंपन्यांशी आर्थिक लागेबांधे असल्याचा आरोप त्यांनी केला होता. या पत्राला उत्तर देताना सरनाईक यांनी रिक्षाचालकांच्या प्रश्नांबाबत राऊत यांनी दाखविलेल्या आस्थेचे उपरोधिक शब्दांत स्वागत केले. बाईक टॅक्सीमुळे रिक्षाचालकांच्या रोजगारावर परिणाम होण्याची चिंता रास्त असू आहे. त्याचवेळी बाईक टॅक्सीच्या माध्यमातून तरुण-तरुणींना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.‘रॅपिडो’शी काही मंत्र्यांचे आर्थिक आणि व्यावसायिक संबंध असल्याचा आरोप गंभीर आहे. त्यामुळे केवळ राजकीय आरोप न करता त्यासंबंधी ठोस पुरावे आणि तथ्ये सादर करावीत, असे सरनाईक यांनी म्हटले. परिवहन विभागातील निर्णय हे कोणाच्या ओळखीवर नव्हे, तर नियम, कायदा आणि प्रवाशांच्या हिताच्या आधारे घेतले जातात, असा दावाही त्यांनी केला. राऊत यांची राजकीय वेग सुरु असल्याचे ते म्हणाले.
‘रॅपिडो असो किंवा कोणतीही अन्य कंपनी, सरकारपेक्षा मोठी नाही. कोणत्याही कंपनीला नियमांपेक्षा वरचे स्थान दिले जाणार नाही,’ असे स्पष्ट करताना बदलत्या वाहतूक व्यवस्थेपासून राज्याला दूर ठेवणेही शक्य नसल्याचे सरनाईक यांनी सांगितले. आधुनिक वाहतूक सेवांसोबत पारंपरिक रिक्षाचालकांचा रोजगार आणि सामाजिक सुरक्षा जपण्याची जबाबदारीही सरकारचीच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रिक्षाचालकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राऊत यांच्यासोबत बैठक घेण्याची तयारी दर्शविताना, वेळ आणि ठिकाण ठरवूया; अगदी राऊत यांच्या वृत्तपत्र कार्यालयात येण्यासही आपण तयार असल्याचे सरनाईक यांनी म्हटले. मात्र, चर्चेत ‘राजकीय हॉर्न’ कमी आणि ‘वस्तुस्थितीचा मीटर’ अधिक वापरूया, असा टोला त्यांनी लगावला.
