उजनीच्या पाणी प्रश्नावर राष्ट्रवादीच्या विरोधात भाजप आणि काँग्रेस ; बारामती-इंदापूरला पाणी देण्यास विरोध

उजनीचे पाणी इंदापूर व बारामतीच्या १७ गावांना देण्यासाठी ३४७ कोटी रुपये खर्चाची प्रशासकीय मान्यताही मिळविली आहे.

एजाजहुसेन मुजावर, लोकसत्ता

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान समजल्या जाणाऱ्या उजनी धरणातील पाणी लाकडी- निंबोणी उपसा सिंचन योजनेच्या नावाखाली इंदापूर व बारामती भागाला नेण्याचा निर्णय शासनाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावाखाली घेतला आहे.

मुळात सोलापूर जिल्ह्यातील बहुतांशी उपसा सिंचन योजनांसह अन्य पाणी योजना वर्षांनुवर्षे निधीअभावी अपूर्ण असताना आणि उजनीच्या पाणी वाटपाचे नियोजन यापूर्वीच पूर्ण झाले असताना आता मधूनच इंदापूर व बारामतीला पाणी उचलून नेण्यात येत आहे. त्यास विरोध वाढला असून उजनीचे पाणी पेटले आहे. यात राजकीयदृष्टय़ा कोंडी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला घेरण्याची संधी भाजपलाच नव्हे तर महाविकास आघाडीतील काँग्रेस व शिवसेना या घटक पक्षांनाही मिळाली आहे.

इंदापूरचे राष्ट्रवादीचे आमदार असलेले सोलापूरचे पालकमंत्री दत्ता भरणे यांनी उजनीचे पाणी इंदापूर व बारामतीच्या १७ गावांना देण्यासाठी ३४७ कोटी रुपये खर्चाची प्रशासकीय मान्यताही मिळविली आहे. गतवर्षी एप्रिलमध्ये याच भरणे यांनी सर्वप्रथम उजनीत पुणे व पिंपरी-चिंचवडमधून येणारे सांडपाणी अडवून इंदापूर व बारामतीला नेण्याची योजना पुढे आणली होती. प्रत्यक्षात सांडपाणी नव्हे तर उजनीचेच पाणी थेट उचलून नेण्याचा तो डाव होता. त्यामुळे सोलापुरातील राष्ट्रवादीसह सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी  विरोध केला होता. त्यामुळे शासनाला ती योजना गुंडाळून ठेवावी लागली होती. त्यानंतर आता पुन्हा लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून थेट उजनीचेच पाणी उचलण्यात येणार असल्यामुळे सोलापुरात उद्रेक सुरू झाला आहे. उजनी धरणावर अवलंबून असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील एकरूख, शिरापूर, आष्टी, बार्शी, मंगळवेढा, दहिगाव आदी उपसा सिंचन योजना पुरेशा निधीअभावी  रखडल्या आहेत.

यातील काही योजना पूर्णत्वाच्या मार्गावर असून त्या पूर्ण होऊन स्थानिक भागाला शेतीला पाणी मिळण्यासाठी थोडासा निधी उपलब्ध होणे अपेक्षित आहे. परंतु अशा योजनांकडेही शासनाचे दुर्लक्ष आहे. सोलापूरचे पालकमंत्री म्हणून दत्ता भरणे यांचीही ही जबाबदारी आहे. परंतु ते सोलापूरचे पालकमंत्री आहेत की इंदापूर व बारामतीचे, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. उजनीतील सोलापूर जिल्ह्याच्या हक्काच्या पाण्याला हात न लावता हे पाणी इंदापूर व बारामतीला नेण्यात येणार असून यात सोलापूरकरांनी कोणताही गैरसमज करून घेऊ नये, असे स्पष्टीकरण भरणे यांनी केले आहे.

परंतु त्यावर सोलापूरकर विश्वास ठेवायला तयार नाहीत.  एकूण १२३ टीएमसी क्षमतेच्या उजनी धरणाच्या पाण्याचे वाटपाचे नियोजन यापूर्वीच झाले आहे. यात बहुतांशी पाणी सोलापूर जिल्ह्याच्या वाटय़ाला येणार आहे. परंतु येथील पाणी सिंचन योजना वर्षांनुवर्षे रखडली आहे. अगोदर सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे पाणी शाबूत ठेवा आणि मगच इतर योजनांचा विचार करा, अशी मागणी करण्यात येत आहे. पाणी पळविण्यामागे राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा हात  असल्याची भावना सोलापूरमध्ये झाली आहे.

काँग्रेसचा इशारा

उजनी धरणाच्या पाणी प्रश्नावर राष्ट्रवादीची कोंडी करण्याची भाजपला संधी आहे. त्यातच  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी सोलापूर जिल्ह्यात येत आहेत. त्याचे औचित्य साधून भाजप राष्ट्रवादीच्या विरोधात आणखी आक्रमक पवित्रा घेऊ शकतो. त्यादृष्टीने हालचाली वाढल्या आहेत. हे कमी म्हणूनच की काय, उजनीचे पाणी इंदापूर व बारामतीला वळवून नेण्याच्या मुद्दय़ावर काँग्रेसनेही उडी घेतली आहे. आमदार प्रणिती िशदे यांनीही, सोलापूरकरांचे हक्काची उजनीचे पाणी कोणत्याही परिस्थितीत इंदापूर व बारामतीला जाऊ देणार नाही. या प्रश्नावर रान पेटवू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bip and congress against ncp on ujjani dam water issue zws

Next Story
अतिरिक्त उसाची धास्ती ; ३१ मे पर्यंत गाळप होण्याबाबत साशंकता
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी