scorecardresearch

कायद्याच्या अंमलबजावणीसह पक्षीप्रेम, पीडित महिलांना आधार

पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनीही कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी हाती घेतली आहे.

|| एजाज हुसेन मुजावर

सोलापूर : तत्कालीन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या पावणेदोन वर्षांच्या कारकिर्दीनंतर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून आलेले पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनीही कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी हाती घेतली आहे. या माध्यमातून सोलापूरची पारंपरिक कार्यसंस्कृती विकसित करण्याचा प्रयत्न दिसून येतो. दारू, ताडीसारख्या व्यसनातून आणि पुढे साहजिकच गुन्हेगारीकडे वळू पाहणाऱ्या लहान मुलांना व्यसनाच्या विळख्यात सापडू न देण्यापासून ते देह विक्रय करणाऱ्या महिला, रस्त्यावर भीक मागून लाचारीचे जीवन जगणाऱ्या महिला, अनाथ मुलींना स्वत:च्या पायावर सन्मानाने उभे राहण्यासाठी किमान कौशल्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून गारमेंट शिवणकाम प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यापर्यंत विविध कृतिशील उपक्रम बैजल यांनी लोकसहभागातून चालविले आहेत. स्वच्छ आणि पारदर्शक प्रशासन चालविताना पोलीस खात्यातील वाईट प्रवृत्तीचा बीमोड करून चांगल्या प्रवृत्तीला प्रोत्साहन देण्याबरोबरच पोलीस खात्यात वीज बचतीसारख्या बारीकसारीक गोष्टींकडेही बारकाईने लक्ष दिले आहे.

कमी कालावधीसाठी सोलापुरात काम करताना बैजल यांनी समाजमनावर प्रभाव पाडत स्वत:चा ठसा उमटविला आहे.  दुर्दैवाने राजकीय नेत्यांना लोकप्रतिनिधींना स्वत:चे हितसंबंध जोपासताना बैजल यांच्यासारखे कार्यक्षम, शिस्तप्रिय आणि कर्तव्यतत्पर वरिष्ठ अधिकारी नकोसेच वाटतात. सोलापुरात वाहतूक नियमन प्रणालीत सुधारणा करताना काही लोकप्रतिनिधींनी त्यात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. परंतु बैजल हे कायदा आणि संवेदनशीलता यांची सांगड घालत सद्सद्विवेकबुध्दीने भूमिका घेतली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bird love law enforcement support victimized women akp

ताज्या बातम्या