MPSC Paper Leak Case Drug Inspector Exam Breakup Angle details: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक (गट-ब) पदासाठी झालेल्या चाळणी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने सहा जणांना अटक केली असून यात एमपीएससीच्या तीन अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. दरम्यान पेपरफुटीप्रकरणामागील एक धक्कादायक बाब समोर आली आहे. एका ब्रेकअपमुळे पेपरफुटीचे प्रकरण समोर आल्याची माहिती मिळत आहे. गुन्हे शाखेने केलेल्या आरोपानुसार, लोकेश उर्फ गौरव पाटील (२४) याला २२ मार्च रोजी झालेल्या परीक्षेपूर्वी त्याची प्रेयसी ऋतुजाकडून एमपीएससीच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका मिळाली होती.
द इंडियन एक्सप्रेसने यासंबंधीचे सविस्तर वृत्त दिले आहे. परीक्षेचा निकाल लागल्यानंतर ऋतुजा चांगल्या गुणांनी पास झाली आणि दोघांमधील नाते संपुष्टात आले. प्रेयसीला आता सरकारी नोकरी मिळेल आणि ती पुढे निघून जाईल, अशी भीती वाटल्याने गौरव पाटीलने पेपरफुटीबद्दल एमपीएससीकडे तक्रार दाखल केली.
औषध निरीक्षक (गट-ब) पदाच्या परीक्षेत सातवा क्रमांक पटकावणाऱ्या ऋतुजालाही याप्रकरणी नोटीस बजावली आहे. तिला आधीच पेपर मिळाला होता, असा आरोप करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त राजतिलक रौशन यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, लोकेश उर्फ गौरव पाटील याने सुरुवातीला पेपरफुटीबद्दलची माहिती एमपीएससीला दिली. मात्र नंतर तो स्वतःच पेपरफुटीत सामील असल्याचे तपासातून पुढे आले.
प्रकरण काय?
गुन्हे शाखेच्या तपासात निष्पन्न झाले की, २२ मार्च झालेल्या परीक्षेपूर्वी ऋतुजाचे वडील अमृत पाटील (५५) यांनी नंदुरबार येथील मध्यस्थ असलेल्या प्रवीण पाटील (४०) यांच्याशी संपर्क साधला. प्रवीण पाटील हे एमपीएससीच्या तीन अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचा आरोप आहे. सहायक विभाग अधिकारी विश्वेश्वर नकाते (३५), अवर सचिव अभिजीत लेंढवे आणि सहायक विभाग अधिकारी गोपाळ मराठे (३७) यांनी प्रश्नपत्रिका मिळवून देण्यात मदत केली. या तिघांनाही अटक करण्यात आली आहे.
पाच लाख रुपयांत घेतली प्रश्नपत्रिका
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण पाटील यांनी एमपीएससीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पाच लाख रुपये दिले होते आणि त्यानंतर आणखी पैसे देण्याचे आश्वासन दिले. प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर अमृत पाटील यांनी परीक्षेच्या काही दिवस अगोदर आपली मुलगी ऋतुजाला प्रश्नपत्रिका दिली. ऋतुजाने परीक्षेच्या दोन दिवस आधी हा पेपर व्हॉट्सॲपवरून गौरवलाही पाठवला. गौरवचा भाऊदेखील ही परीक्षा देणार होता.
ऋतुजाने या परीक्षेत सातवा क्रमांक पटकावला. पण निकाल जाहीर होईपर्यंत गौरव आणि ऋतुजाचे नाते तुटले होते. पोलिसांचा आरोप आहे की, ब्रेकअप झाल्यानंतर गौरवने ही माहिती उघड केली. ऋतुजा सरकारी अधिकारी झाल्यानंतर त्याला विसरून जाईल, अशी त्याला भीती वाटत होती. गौरव पाटीलने स्पर्धा परीक्षा देणाऱ्याचा मित्र असल्याचा दावा करत एमपीएससीला ईमेल केला आणि २२ मार्च रोजीचा पेपर फुटल्याचा दावा केला.
एमपीएससीने या तक्रारीची चौकशी सुरू केली. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी जुलै महिन्यात हा विषय हाती घेऊन त्याचा स्वतंत्रपणे पाठपुरावा सुरू केला. नंदुरबारमधील एका कोचिंग इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दोन दिवस आधी प्रश्नपत्रिकेतील बहुतेक प्रश्न मिळाले होते, असा आरोप त्यांनी केला.
एमपीएससीने मुंबई पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर गुन्हे शाखेच्या मालमत्ता शाखेने सदर प्रकरणाचा तपास सुरू केला.
प्रियकरच जाळ्यात अडकला
तपासाच्या सुरुवातीला गौरव पाटीलचा जबाब नोंदवला गेला. पण तापस पुढे जात असताना अधिकारी आपल्या जवळ पोहोचत असल्याचे त्याच्या लक्षात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर त्याने पुन्हा एकदा एमपीएससीकडे संपर्क साधत परीक्षेच्या प्रक्रियेबद्दल आपला गोंधळ झाल्याचा दावा करत तक्रार मागे घेण्याचा प्रयत्न केला. मात्र गुन्हे शाखेने आपला तपास सुरू ठेवला आणि प्रश्नपत्रिका खरोखरच फुटली होती आणि गौरवलाही ती परीक्षेपूर्वीच मिळाली होती, ते तपासात पुढे आले.
द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, जर गौरव खरोखरच व्हिसलब्लोअर होता तर त्याने परीक्षेपूर्वीच एमपीएससीला सावध करायला हवे होते.
अटक केलेल्या सहाही जणांना बुधवारी मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना २ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून अन्न व औषध प्रशासनातील ‘औषध निरीक्षक’ या (गट-ब) पदासाठी २२ मार्च रोजी परीक्षा घेण्यात आली होती. राज्यातील सहा महसूल विभागांमधील केंद्रांवर ४४,५०० उमेदवार परीक्षेला बसले होते. १२ जून रोजी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. ज्यामध्ये ५०६ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले. २२ जुलै रोजी ४८८ उमेदवारांची तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली.
