आज विधानसभेत अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना १६४ मतं मिळाली असून त्यांनी विजयी जल्लोष केला आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपा आणि शिंदे गटाची ही पहिली परीक्षा होती, यात सत्ताधारी पक्ष उत्तीर्ण झाला आहे. उद्या भाजपा आणि शिंदे गटाला विधानसभेत बहुमत चाचणीला सामोरं जावं लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

भाजपा आणि शिंदे गटाची संयुक्त बैठक मुंबईतील ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये पार पडणार आहे. याठिकाणी उद्या बहुमत चाचणीला सामोरं जाताना काय रणनीती असायला हवी, याबाबत चर्चा केली जाणार आहे. या बैठकीला भाजपाचे आणि शिंदे गटाचे सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. यादरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा नेते चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते दीपक केसरकर आमदारांना मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, विरोधी पक्षनेता कोण असावा, याबाबत चर्चा करण्यासाठी वाय. बी चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार, छगन भुजबळ देखील उपस्थित आहेत.