सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण नगरपरिषद आणि कणकवली नगरपंचायत निवडणुकांमुळे राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला आहे. महायुतीमधील भाजप आणि शिवसेना शिंदे गट स्वबळावर रिंगणात उतरल्याने राजकीय चित्र बदलले आहे. यातच नारायण राणे व त्यांच्या दोन मुलांच्या भूमिकेबद्दलही उत्सुकता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा दर्शविल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथे नगरपंचायत नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी त्यांची भेट घेतली, तेव्हा खासदार राणे यांनी हा पाठिंबा जाहीर केला.

खासदार राणे यांनी भाजप उमेदवारांना पाठिंबा दिल्याने, त्यांचे सुपुत्र आणि शिवसेना (शिंदे गट) आमदार नीलेश राणे यांची भूमिका आता महत्त्वाची ठरणार आहे. पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार नीलेश राणे या दोन मुलांची निवडणुकीतील भूमिका राजकीय संघर्ष निर्माण करणारी ठरली आहे. जिल्ह्यात महायुती आणि महाआघाडी झाली नाही. या निवडणुकीत स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या आघाड्या आणि युतीचे चित्र पाहायला मिळत आहे.

कणकवलीत दोन्ही शिवसेना एकत्र

कणकवली नगरपंचायत: येथे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची युती झाली आहे. या ठिकाणी अजित पवार राष्ट्रवादीला एक जागा दिली आहे. या युतीविरोधात शिवसेना (शिंदे गट) आणि ठाकरे शिवसेना एकत्र लढत आहेत, ज्यांनी काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी, मनसे आणि आप यांच्याबरोबर मिळून शहर विकास आघाडी स्थापन केली आहे. सावंतवाडीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) स्वतंत्र लढत आहेत. तर शिवसेना(ठाकरे), राष्ट्रवादी (शरद पवार) आणि मनसे यांची युती झाली आहे. मालवण आणि वेंगुर्ला येथे भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होत आहे.

सावंतवाडी नगरपरिषद : येथील निवडणुकीत भाजपच्या प्रचारसभेत पालकमंत्री नितेश राणे यांनी भाजपच्या नगराध्यक्षपदरच्वर उमेदवार श्रद्धा सावंत भोसले यांना दिलेले मत म्हणजे आमदार दीपक केसरकर यांना मत आहे, असे अप्रत्यक्ष सांगितले. यावर माजी शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी, अफवा पसरवून लोकांची दिशाभूल केली जात असल्याचे सांगून ॲड. नीता कविटकर सावंत याच शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार आहेत, असे स्पष्ट केले.

खापर रवींद्र चव्हाणांवर

१) खासदार नारायण राणे यांनी जिल्ह्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुती झाली पाहिजे, असे निर्देश दिले होते. मात्र, महायुती न झाल्याचे खापर आमदार नीलेश राणे यांनी थेट भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावर फोडले आहे.

२) या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला धक्का देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून रणनीती आखल्याचे बोलले जात आहे. तर आपण पालकमंत्री नितेश राणे यांना महायुतीसाठी भेटलो पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही असे आमदार दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.

३) मालवण येथे शिवसेना आमदार नीलेश राणे यांच्या विरोधात भाजपने जोरदार आघाडी उघडली आहे. याला उत्तर देताना नीलेश राणे यांनी मालवण भाजपच्या नगराध्यक्ष उमेदवाराच्या जातीच्या दाखल्याची छाननी करण्याची मागणी केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीच्या घटक पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर तीव्र संघर्ष दिसून येत आहे. त्याचा फायदा ठाकरे शिवसेना, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडी करून घेऊ शकले असते पण त्यांच्याकडून महा विकास आघाडी वर भर दिला गेला नाही. उलट काँग्रेसने एकला चलो ची भूमिका अवलंबली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात जोरदार लढत होत आहे.

नीलेश राणेंकडून भाजपवर आरोप

सावंतवाडी : शिंदे गटाचे आमदार नीलेश राणे यांनी बुधवारी मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या घरी पैसे सापडल्याचा आरोप केला. भाजपने हा आरोप फेटाळला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सत्ताधारी पक्षांमधील वाद चव्हाटय़ावर आला आहे. निवडणुकीत मतदारांना पैसे वाटप करण्यासाठी ही रक्कम आणल्याचा दावा नीलेश राणे यांनी केला. अशा गैरप्रकारांमुळे आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, संबंधित भाजप पदाधिकाऱ्याने आपण बांधकाम व्यावसायिक आहोत. त्या कामाचे ते पैसे असल्याचे पत्रकारांना सांगितले. पालिका निवडणुकांसाठी २ डिसेंबरला मतदान होणार आहे.