उपमहापौरपदी भाजपचे अनिल फुलझेले बिनविरोध

चंद्रपूर शहर महापालिकेच्या महापौर पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत भाजपच्या अंजली घोटेकर या सलग तिसऱ्या महिला महापौर म्हणून विजयी झाल्या. त्यांनी बसपच्या रंजना यादव यांचा ४२ विरुद्ध २३ मतांनी पराभव केला, तर उपमहापौरपदी भाजपचे अनिल फुलझेले बिनविरोध निवडून आले. दरम्यान, यानंतर महापौर घोटेकर यांनी स्थायी समितीसाठी एकूण १६ सदस्यांची निवड केली. यामध्ये भाजपचे १०, काँग्रेस ३, बसप २ व नगरविकास आघाडीच्या एका सदस्याचा समावेश आहे.

महापालिकेच्या महापौर पदासाठी आज मनपाच्या सभागृहात पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशुतोष सलिल व मनपा आयुक्त संजय काकडे यांनी निवडणुकीची प्रक्रिया राबविली. महापौर पदासाठी भाजपकडून अंजली घोटेकर, तर बसपकडून रंजना यादव असे दोन नामांकन दाखल झाले होते. यापैकी एकाही उमेदवाराने नामांकन मागे घेतले नाही. त्यामुळे महापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. एकूण ६६ सदस्य संख्या असलेल्या या मनपात नगरसेवकांनी हात वर करून मतदान केले असता भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवार अंजली घोटेकर यांना ४२ तर बसपच्या रंजना यादव यांना २३ मते मिळाली. बसपचे प्रदीप डे प्रकृती अस्वस्थतेच्या कारणामुळे सभेला अनुपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया पार पडताच जिल्हाधिकारी सलिल यांनी अंजली घोटेकर यांना सर्वाधिक ४२ मते मिळाल्याने त्यांना विजयी घोषित केले, तर उपमहापौर पदासाठी भाजपचे अनिल फुलझेले यांचा एकमेव उमेदवारी अर्ज होता. त्यामुळे त्यांना बिनविरोध विजयी घोषित करण्यात आले. मनपात भाजपचे एकूण ३६ सदस्यांसह बहुमत आहे. भाजपने ४० नगरसेवकांचा गट तयार केला असून यामध्ये दोन अपक्ष व दोन मनसे नगरसेवकांचा समावेश आहे, तर शिवसेनेच्या दोन नगरसेवकांनी ऐनवेळी भाजपला समर्थन दिले आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपला ४२ मते मिळाली आहे, तर बसपच्या रंजना यादव यांना काँग्रेसचे १२ व राष्ट्रवादी काँग्रेसचे २ आणि १ अपक्ष नगरसेवकांनी समर्थन दिल्याने २३ मते मिळाली आहेत. यावेळी जिल्हाधिकारी सलिल व मनपा आयुक्त काकडे यांनी नवनियुक्त महापौर घोटेकर व उपमहापौर फुलझेले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर महापौर व उपमहापौरपदी विराजमान करण्यात आले. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुलाल व पुष्पगुच्छ उधळत, ढोल-ताशांच्या निनादात, फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला.

घोटेकर या विवेक नगर प्रभाग ५ तर फुलझेले हे तुकूम प्रभाग १ मधून विजयी झाले आहेत. दोघांचीही ही सलग तिसरी टर्म आहे. घोटेकर यांनी भाजप वार्ड अध्यक्षापासून कारकीर्द सुरू केली. त्यानंतर महिला आघाडी तालुकाध्यक्ष, जिल्हा संघटक, जिल्हा सरचिटणीस अशा संघटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. दरम्यान, महापौर घोटेकर यांनी आजच्या विशेष सभेत स्थायी समितीची १६ सदस्यांची नावे जाहीर केली. यामध्ये भाजपच्या सोपान वायकर, वंदना जांभुळकर, राजेंद्र अडपेवार, छबू वैरागडे, खुशबू चौधरी, संगीता खांडेकर, राहुल पावडे, ज्योती गेडाम या भाजपच्या आठ, मनसेचे सचिन भोयर व अपक्ष नीलम आक्केवार तर काँग्रेसच्या सुनीता लोढीया, अशोक नागापुरे, प्रशांत दानव, बसपचे प्रदीप डे, धनराज सावरकर तर नगर विकास आघाडीचे स्नेहल रामटेके यांचा समावेश आहे. या निवडणुकीनंतर आमदार नाना शामकुळे यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या मुख्य मार्गाने रॅली काढण्यात आली. रॅलीत महापौर घोटेकर, उपमहापौर फुलझेले यांच्यासह भाजप नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

शहर विकासाला प्राधान्य -घोटेकर

नाले मजबुतीकरण, रस्ते रुंदीकरण, पाणीपुरवठा योजना, अवैध बांधकाम, खुल्या जागा विकसित करणे, सर्व विभाग प्रमुखांची पंधरा दिवसातून एकदा बैठक घेऊन समस्या मार्गी लावणे आदी कामांना प्राधान्य देणार असल्याचे महापौर घोटेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर व आमदार नाना शामकुळे यांच्या आशीर्वादाने महापौरपदी विराजमान झाले असून शहर विकासाच्या सर्वच कामांना प्राधान्य देणार, असेही त्या म्हणाल्या.

सव्वा वर्षांचा कार्यकाळ

महापौरपदाचा कार्यकाळ हा अडीच वर्षांचा असला तरी अंजली घोटेकर यांना केवळ सव्वा वर्षांसाठीच महापौरपदी विराजमान करण्यात आले आहेत. सव्वा वर्षांनंतर त्यांचा राजीनामा घेऊन दुसऱ्या ओबीसी महिलेची यापदी वर्णी लावली जाणार आहे. यासंदर्भात घोटेकर यांना विचारले असता, त्यांनी यावर थेट उत्तर न देता नेते सांगतील त्यानुसार आणि तितक्याच कालावधीसाठी काम करणार, असे त्या म्हणाल्या.