BJP Candidate for Rajya Sabha Elections: राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. महाराष्ट्रातील सर्वाधिक म्हणजेच सात जागा रिक्त होणार आहेत. त्यानुसार भाजपाकडून महाराष्ट्रातील जागांसाठी आपले चार उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. भाजपाचे सरचिटणीस आणि बिहारचे प्रभारी विनोद तावडे यांचे नाव राज्यसभा निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आले आहे. २०१९ नंतर संसदीय राजकारणापासून दूर असलेले विनोद तावडे यांचे यानिमित्ताने पुनरागमन होत आहे.

विनोद तावडे यांच्यासह भाजपाने आरपीआय (आठवले) गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, श्रीमती माया चिंतामन ईवनाते आणि रामराव वडकुते यांचीही नावे राज्यसभा निवडणुकीसाठी जाहीर केली आहेत.

१० राज्यांमधील राज्यसभेच्या ३७ जागांसाठी १६ मार्च रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी ५ मार्च पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. भाजपाने देशभरात उमेदवारी जाहीर करताना संघटनात्मक प्रभाव असलेल्या नेत्यांना प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्रातून कुणाची नावे चर्चेत होती?

फेब्रुवारी महिन्यात भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली होती. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह १२ वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत विनोद तावडे, रामदास आठवले, रावसाहेब दानवे, प्रीतम मुंडे, विजया रहाटकर आणि भागवत कराड यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांच्या नावांवर चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. पक्ष अनुभव, निष्ठा आणि प्रादेशिक प्रतिनिधित्वाचा विचार करत उमेदवार जाहीर केले जातील, अशी माहिती त्यावेळी नेत्यांनी दिली होती.

बिहारच्या विजयात तावडेंचा महत्त्वाचा वाटा

गतवर्षी झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाचा मोठा विजय झाला होता. या विजयात राष्ट्रीय सरचिटणीस आणि बिहारचे प्रभारी विनोद तावडे यांचे महत्त्वाचे योगदान होते. भाजपाने या निवडणुकीची जबाबदारी तावडे यांच्यावर सोपवली होती आणि तावडे यांनी ही जबाबदारी चोखपणे पार पाडली. या निवडणुकीत एनडीएने २०० हून अधिक जागांवर आघाडी मिळवली. तर भाजपाने सर्वाधिक ८९ जागा जिंकल्या.

“राज्यसभेसाठी अनेक नावे चर्चेत आहेत. त्या नावांपैकी एक नाव प्रीतम मुंडे यांचेदेखील आहे. त्या आधी खासदार होत्या. पण पक्षाच्या आदेशानुसार मी लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यानंतर प्रीतम मुंडे यांनी पक्षाचे काम केले. आता प्रीतम मुंडे यांच्या नावाबरोबरच आणखी काही नावेदेखील चर्चेत आहेत. बाकी निर्णय आमच्या पक्षाचे सर्व नेते घेतील, अशी आमची अपेक्षा आहे”, असे पंकजा मुंडे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या होत्या.