Video: "सुप्रिया सुळेंनी गजनी चित्रपट पुन्हा पाहावा", आशिष शेलारांचा टोला; म्हणाले, "...ही प्रकरणं केली कुणी?" | bjp ashish shelar mocks supriya sule on devendra fadnavis alligations uddhav thackeray | Loksatta

Video: “सुप्रिया सुळेंनी गजनी चित्रपट पुन्हा पाहावा”, आशिष शेलारांचा टोला; म्हणाले, “…ही प्रकरणं केली कुणी?”

आशिष शेलार म्हणतात, “…हे त्या वेळच्या गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचंच पाप होतं. कुणाला सुडाचं राजकारण सांगताय ताई? ही सगळी प्रकरणं कुणी केली?”

ashish shelar on supriya sule
आशिष शेलार यांचा सुप्रिया सुळेंना खोचक टोला (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

गेल्या काही दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच्या ठाकरे सरकारवर केलेल्या आरोपांची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीसांनी एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यासंदर्भात सत्ताधारी भाजपा आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगलं आहे. महाविकास आघाडीकडून हे आरोप फेटाळण्यात आले आहेत. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी दिलेल्या प्रतिक्रियेवर आज आशिष शेलार यांनी खोचक टोला लगावत टीकास्र सोडलं आहे.

नेमका वाद काय?

देवेंद्र फडणवीसांनी कार्यक्रमात बोलताना ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले. “माझ्याकडून कुठलंही वैर नव्हतं. पण मातोश्रीचे दरवाजे मला उद्धव ठाकरेंनी बंद केले. पाच वर्षे आम्ही सत्तेत होतो तरीही ते असं वागले. एवढंच नाही तर मी तुम्हाला हे सांगतो की मी राजकीय वैर ठेवणारा माणूस नाही.मात्र अडीच वर्षांचं महाविकास आघाडी सरकार असताना माझ्यावर केसेस टाकण्याचं, माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचं, काहीही करून मला तुरुंगात टाकण्याचं टार्गेटच त्यावेळी सीपी असलेल्या संजय पांडे यांना दिलं होतं”, असं फडणवीस म्हणाले होते.

सुप्रिया सुळेंची नाराजी

दरम्यान, या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंनी नाराजी व्यक्त करताना देवेंद्र फडणवीसांकडून ही अपेक्षा नव्हती, असं म्हटलं. “देवेंद्र फडणवीसांनी केलेलं वक्तव्य हे हास्यास्पद आहे. मला वाटतं दिलीप वळसे पाटील त्याच्यावर सविस्तर बोलले आहेत. देवेंद्रजी, आपसे ये उम्मीद न थी. मला देवेंद्र फडणवीसांकडून जास्त अपेक्षा होत्या. मला वाटलं होतं की गॉसिप किंवा खोट्या गोष्टी पसरवण्यापेक्षा त्यांनी एक गृहमंत्री म्हणून त्यांनी पुण्यातील कोयता गँग, धायरीत वादादरम्यान पिस्तुलं काढण्याच्या घटनेवर बोलावं. त्यांनी हे काय कुठलं काढलंय हे त्यांनाच माहिती”, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली.

“सुप्रियाताईंना ‘तो’ आजार होऊ नये…”

सुप्रिया सुळेंच्या भूमिकेवर आता भाजपा आमदार आणि मुंबई शहर अध्यक्ष आशिष शेलार यांनी तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. “सुप्रियाताईंनी पुन्हा एकदा गजनी सिनेमा पाहावा अशी माझी इच्छा आहे. कारण त्या सिनेमात शॉर्ट मेमरीचा आजार असल्याचं दाखवलंय. ताईंना असा आजार होऊ नये अशी माझी इच्छा आहे. कारण त्यांची वक्तव्य त्याच पद्धतीची दिसतायत. मी पूर्ण यादी वाचून दाखवेन ताईंना. सूडाच्या राजकारणाची भूमिका टोकापर्यंत नेणारं सरकार म्हणजे उद्धव ठाकरेंचं शरद पवार आणि काँग्रेसच्या समर्थनाचं सरकार होतं”, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.

Video: “देवेंद्रजी, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती”, सुप्रिया सुळेंची ‘त्या’ विधानावरून फडणवीसांवर टीका!

“सुडाचं राजकारण कुणाला सांगताय ताई?”

“देवेंद्र फडणवीस म्हणाले की त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न ठाकरे सरकारने केला. याचा साक्षीदार मी स्वत: आहे. त्या काळात २५० पानांचा अहवाल तत्कालीन आयुक्त संजय पांडे यांनी त्यांच्या खासगी जागेत ठेवलेला आणि नंतर सार्वजनिक कार्यालयात आणला. तो अहवाल मी स्वत: वाचला आहे. त्यात कुठल्या पानावर देवेंद्र फडणवीसांचं नाव लिहिण्याचा त्यांनी प्रयत्न केला, हे मी स्वत: वाचलंय. एका गोष्टीच्या चौकशीत दुसरी गोष्ट आणणं हे काम तत्कालीन आयुक्तांकडून करून घेण्याचा प्रयत्न हे त्या वेळच्या गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचंच पाप होतं. कुणाला सुडाचं राजकारण सांगताय ताई?” असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

“एका संपादकाला घरातून खेचून तुम्ही अटक केली. मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले म्हणून एका सामान्य नागरिकाचं जाहीर मुंडन केलंत. एका पत्रकाराने करोनाच्या काळात व्यावसायिक बिल्डरला फिरायची मुभा का? हा प्रश्न विचारला तर त्या पत्रकारालाही काहीशे किलोमीटरवरून आणून तुम्ही अटक केली. विनयभंगाच्या गुन्ह्यावरून जितेंद्र आव्हाड आणि सुप्रियाताई आवाज करतायत. तुमच्याच काळात माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा महापौरांनी दाखल केला. तेव्हा तुमची दातखिळी कुठे बसली होती. मोहीत भारतीय, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, मी, गिरीश महाजन, स्वत: देवेंद्र फडणवीसांना अडकवण्याचा प्रयत्न करणं.. ही प्रकरणं केली कुणी?” असं आशिष शेलार म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2023 at 13:54 IST
Next Story
“ठाण्यातले निष्ठावान आणि अस्सल शिवसैनिक माझ्यासोबत, जे विकाऊ होते ते…”; उद्धव ठाकरेंची टोलेबाजी