रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना सुप्रीम कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. यासोबतच सुप्रीम कोर्टाने अर्णब गोस्वामी यांची तात्काळ सुटका करण्याचा आदेश दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर भाजपा नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत न्यायालयाचे आभार मानले आहेत. ट्विट करत त्यांनी न्यायाची थट्टा करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही असं म्हटलं आहे.

आशिष शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “धन्यवाद आदरणीय सुप्रीम कोर्ट…कायद्याचं राज्य कायम आहे. न्यायाची थट्टा करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीच्या अहंकार किंवा अजेंडासाठी वैयक्तिक स्वातंत्र्य ओलीस ठेवू शकत नाही”. आशिष शेलार यांनी यावेळी #Arnabisback हा हॅशटॅगही दिला आहे.

वास्तुसजावटकार अन्वय नाईक यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अर्णब गोस्वामी यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. अर्णब गोस्वामी यांच्यासहित इतर दोन आरोपींनाही अंतरिम जामीन देण्यात आला आहे. ५० हजारांच्या जामिनावर तात्काळ सुटका करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

अर्णब गोस्वामी यांच्या अंतरिम जामिनाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु होती. अर्णब गोस्वामी यांची जामीन याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर काही तासातच त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड व न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्या सुटीतील न्यायपीठापुढे सुनावणी पार पडली. अर्णब गोस्वामी यांना जामीन नाकारताना उच्च न्यायालयाकडून चूक झाल्याचं सुप्रीम कोर्टाने यावेळी म्हटलं. वैयक्तिक स्वातंत्र्य नाकारताना उच्च न्यायालयाने योग्य कारवाई केली नसल्याचं सुप्रीम कोर्टाने सांगितलं.