दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मुंबईतील खड्डे हा मुंबईकरांसाठी चिंतेचा, मनस्तापाचा आणि राजकीय पक्षांसाठी आरोप-प्रत्यारोपाचा मुद्दा ठरल्याचं चित्र दिसू लागलं आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील खड्ड्यांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच खड्डे बुजवण्यात गैरप्रकार करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करणार असल्याचं जाहीर केल्यानंतर महापौरांनी मुंबईतील ४२ हजार खड्डे भरल्याचा दावा केला. यावरून टीका करतानाच भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खड्डे बुजवण्याच्या कामात हयगय किंवा गैरप्रकार करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर त्यावर आशिष शेलार यांनी तोंडसुख घेतलं आहे. “मुख्यमंत्र्यांनी कंत्राटदारावर कारवाई करण्याविषयी फेकलेलं वाक्य भाषणातल्या वाक्यासारखं आहे. जर मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातल्या ज्या विविध एजन्सींच्या अखत्यारीत खड्ड्यांचं काम आहे, त्यांची बैठक घेतली असती, तर आम्हाला पटलं असतं. कंत्राटदारांवर कारवाई केली असती, तरी आम्हाला पटलं असतं”, असं आशिष शेलार म्हणाले.

“…त्यांनीही भूमिका घ्यावी ही विनंती!”

मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर टीका करतानाच त्यांनी सुप्रिया सुळेंवर देखील निशाणा साधला. “मुख्यमंत्र्यांचं वाक्य सुप्रिया सुळेंनी केलेल्या सेल्फी विथ खड्डे आंदोलनासारखं आहे. हे दिखाऊपणाचं आहे. यामुळे जनतेचे प्रश्न सुटणार नाहीत. आता सुप्रियाताई कुठे गेल्या? सेल्फी विथ खड्डे हा कार्यक्रम कुठल्या भाषणात गेला? त्यांनीही भूमिका घ्यावी अशी त्यांना विनंती आहे”, अशी खोचक प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली आहे.

“थोडी तरी शरम करा”…

दरम्यान, यावेळी बोलताना आशिष शेलार यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर देखील टीकास्त्र सोडलं. “महापौर म्हणतात आम्ही ४२ हजार खड्डे बुजवले. थोडी तरी शरम करा. कंत्राटदाराला खड्डे बुजवण्याचे जास्त पैसे मिळावेत म्हणून शिवसेना त्याच्या समर्थनाच्या भूमिका का घेतेय? मुख्यमंत्री म्हणतात कंत्राटदारांवर कारवाई करा. पण वर्षभरात महापालिकेने एकाही कंत्राटदारावर कारवाई केलेली आहे का?”, असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.

सुप्रिया सुळेंनी ४ वर्षांपूर्वी अशा प्रकारे ‘सेल्फी विथ पॉटहोल्स’ मोहीम राबवली होती…!

“..त्याच्यावर हल्ला केलात तर खबरदार”

“एका युवकाने खड्डेरुपी करोनाची रांगोळी काढल्याचा फोटो व्हायरल होतोय. त्याच्यावर शिवसेनेकडून हल्ला होईल की काय ही मला भिती आहे. एका रेडिओ जॉकीने खड्ड्यांवर गाणं केलं, तर तिची तुडवातुडवी केली. पण या युवकावर हल्ला केलात तर खबरदार”, असा इशारा देखील आशिष शेलार यांनी यावेळी दिला.