अलिबाग: अलिबाग विधानसभा मतदारसंघात २०२९ ची निवडणूक भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढवेल, अशी घोषणा भाजपचे नेते अॅड. आस्वाद पाटील यांनी केली. वरसोली येथील होरायझन सभागृहात आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते.
अॅड. पाटील म्हणाले, “विधानसभा २०२४ च्या निवडणुकीत आम्ही ज्यांना मदत केली, त्यांच्याकडून जिल्हा परिषद निवडणुकीत मदतीची अपेक्षा होती. मात्र ती झाली नाही. युती न झाल्याने आम्हाला आमची ताकद समजली.” नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत अलिबाग विधानसभा मतदारसंघात भाजपला ४५ हजारांहून अधिक मते मिळाल्याचा दावा त्यांनी केला. “ही आमची स्वतःची मते आहेत. पूर्वी आम्ही सहाव्या क्रमांकावर असायचो; आता दुसऱ्या क्रमांकावर आलो आहोत,” असे ते म्हणाले.
रायगड जिल्हा परिषदेमधील भाजप सदस्यसंख्येवर भाष्य करताना, “पूर्वी ३ सदस्य होते, ते आता १५ झाले. भविष्यात ३५ करण्याचा प्रयत्न राहील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषद अध्यक्षपदाबाबतही त्यांनी आशावाद व्यक्त करत, “अध्यक्ष भाजपचाच होईल आणि तो चांगले काम करेल,” असे सांगितले.
अलिबाग तालुक्यातील आग्राव येथील शेकडो ग्रामस्थांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला. कार्यक्रमास भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश तुळपुळे, मंडल अध्यक्ष रोशन भगत, भाजपा दक्षिण रायगड जिल्हा महिला अध्यक्ष चित्रा पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. मंजुषा कुर्तमूर्ती, नगरसेवक अॅड. अंकित बंगेरा, पंचायत समिती सदस्य प्रियदर्शनी पाटील तसेच संजय पाटील, संदीप घरत, तनुजा पेरेकर, माणिक बळी, मंदा बळी, संकेत जोशी आदी उपस्थित होते.
संदीप घरत म्हणाले, “भाजपची ताकद वाढवायची असेल तर कार्यकर्त्यांनी संघटनात्मक कामावर भर द्यावा, युनिट्स सक्षम करावीत.” लवकरच चौल येथेही पक्षप्रवेश कार्यक्रम होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
ज्येष्ठ नेते गिरीश तुळपुळे यांनी पक्षप्रवेशाचे स्वागत करत, “या प्रवेशामुळे पक्षाला भविष्यात निश्चित फायदा होईल,” असे नमूद केले. आग्राव येथील गोरख डोयले व जयंत बागवाले यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अॅड. आस्वाद पाटील, गिरीश तुळपुळे, चित्रा पाटील व डॉ. मंजुषा कुर्तमूर्ती यांनी त्यांचे स्वागत केले.

