राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) सुरू असलेल्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी चौकशीला पाचव्यांदा जाणे टाळले. अनिल देशमुख यांनी त्यांच्या वकिलामार्फत तीन पानी पत्र ईडीकडे पाठवले होते. अनिल देशमुख यांचा मुलगा हृषीकेश यांनाही ईडीने समन्स बजावले होते, मात्र तेही चौकशीला उपस्थित नव्हते. दरम्यान भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी अनिल देशमुख यांच्यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

“अनिल देशमुख यांच्या वाटमारीत मुख्यमंत्री आणि शरद पवारांची कितपत भागीदारी होती याचीही चौकशी व्हायला हवी,” अशी मागणी अतुल भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी देशमुख यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. मनी लाँड्रिंग कायद्यान्वये ईडी ही चौकशी करते आहे. याप्रकरणी देशमुख यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी आतापर्यंत पाच वेळा ईडीने समन्स बजावले होते, मात्र देशमुख एकाही चौकशीला हजर झाले नाहीत.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कायद्यातील तरतुदींचा अवलंब करून गुन्हा रद्दीकरणासाठी अपील करण्यापासून ते अन्य उपायांचा अवलंब करण्याची मुभा दिली आहे. या कायदेशीर उपायांचा अवलंब करेपर्यंत कारवाई करू नये, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

आणखी वाचा- “….तोपर्यंत ईडीच्या चौकशीला हजर राहणार नाही”; अनिल देशमुखांनी अखेर सोडलं मौन

दरम्यान भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दाखल करण्यात आलेला प्राथमिक माहिती अहवाल रद्द करावा अशी मागणी करणारी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली.