अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने (ट्रस्ट) केलेल्या जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. आम आदमी पक्ष आणि समाजवादी पक्षाने हा आरोप केला असून ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी निवेदन प्रसिद्ध करत आरोप फेटाळले आहेत. याप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच सरसंघचालक मोहन भागवत यांनी खुलासा करावा अशी मागणी केली आहे. दरम्यान भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेच्या टीकेला उत्तर दिलं असून सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करत असल्याचं म्हटलं आहे.

“मोहन भागवतांनी खुलासा करावा,” राममंदिर जमीन खरेदीतील भ्रष्टाचारावरुन संजय राऊतांचा संताप

अतुल भातखळकर यांनी ट्विट केलं आहे. “सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करते आहे. ही सुपारी कातरून तोंडात टाकण्याची ताकद हिंदू समाजात आहे हे विसरू नका!,” असा इशाराच त्यांनी दिला आहे.

अतुल भातखळकर यांनी एकामागोमाग अनेक ट्विट केले आहेत. “लोकांनी श्रद्धा आणि विश्वासाने राम मंदिरासाठी देणग्या दिल्या आहेत, त्याचा व्यवस्थित हिशोबही ठेवला जातो. शिवसेनेला विश्वास नसेल तर त्यांनी दिलेले एक कोटी परत मागावे. त्यातून एखादी टिपूची मजार बांधावी. शिवसेनेच्या जीवावर मंदिर निर्माण सुरू नाही,” असंही म्हटलं आहे. तसंच “शिवसेनेने आता ‘हजरत टिपू’चा विचार करावा, राम मंदिराचा विचार करण्यासाठी संघ परिवार आणि हिंदू समाज सक्षम आहे,” असंही सांगितलं आहे.

काय आहे प्रकरण

लखनौमध्ये ‘आप’चे खासदार संजय सिंह आणि समाजवादी पक्षाचे नेते पवन पांडे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन ट्रस्टने जमीनखरेदीत घोटाळा केल्याचा आरोप केला. दोन कोटींची जमीन अवघ्या पाच मिनिटांत १८.५ कोटी रुपयांना ट्रस्टने खरेदी केली असून, या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय व सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी करण्याची मागणी संजय सिंह यांनी केली. त्याबाबत चंपत राय यांनी निवेदन प्रसृत केले. ‘‘गेले १०० वर्ष आमच्या वर कुठले ना कुठले आरोप झाले आहेत. महात्मा गांधी यांची हत्या केल्याचाही आरोप आमच्यावर केला गेला. अशा कोणत्याही आरोपांची आम्ही पर्वा करत नाही. या नव्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे याची शहानिशा करून प्रत्युत्तर दिले जाईल,’’ असे चंपत राय यांनी पत्रकारांना सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने श्रीराम जन्मभूमीचा दावा वैध असल्याचा निकाल ९ नोव्हेंबर २०१९ रोजी दिल्यानंतर अयोध्येत जमीन खरेदीसाठी देशातील असंख्य लोक येऊ लागले. उत्तर प्रदेश सरकारही अयोध्येच्या सर्वागीण विकासासाठी मोठय़ा प्रमाणावर जमीन खरेदी करत आहे. जमीन खरेदीसाठी चढाओढ लागल्याने अयोध्येतील जमिनींच्या किमती वाढल्या. ज्या कथित भूखंडाच्या खरेदीबाबत आरोप केले जात आहेत, ती जमीन रेल्वे स्टेशनजवळ अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहे, असे निवेदनात म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी २०२० मध्ये राम मंदिर उभारणीसाठी १५ सदस्यांच्या न्यासाची स्थापना केली. मंदिर उभारणीसंदर्भातील सर्व अधिकार या ट्रस्टकडे देण्यात आले आहेत.

सरसंघचालकांनी भूमिका मांडावी : शिवसेना

अयोध्येत जमीन खरेदीत मोठा भ्रष्टाचार असल्याचे आरोप व त्याबाबतची कागदपत्रे समोर आली आहे. अशाप्रकारचा घोटाळा हिंदूंसाठी संतापजनक असून या प्रकरणाबाबत संस्थेबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, विश्व हिंदू परिषदनेही भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शिवसेनेने के ली आहे.

“इटालियन डोहाळे लागल्यामुळे शिवसेनेकडून राम मंदिराची बदनामी”

प्रभू श्रीराम आणि अयोध्या हा आमच्या श्रद्धा आणि आस्थेचा विषय आहे. काही जणांनी त्याचे राजकारण केले असेल पण आम्ही तसे के ले नाही. राम मंदिर विश्वस्त संस्थेचे सर्व सदस्य भाजप सरकारच्या वतीने नेमण्यात आले आहेत, असे शिवसेनेचे खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आम्ही अयोध्येला गेलो त्यावेळी ठाकरे यांनी शिवसेनेतर्फे एक कोटी रुपयांची रक्कम दिली होती. राम मंदिराच्या नावे देशभरातून-परदेशातून शेकडो कोटी रुपये गोळा झाले आहेत. प्रभू श्रीराम यांच्या नावे एका पैशाचाही घोटाळा होऊ नये. पण जमिनीच्या खरेदीतील घोटाळ्याचे प्रकरण समोर आल्याने श्रद्धेला ठेच लागली आहे. राम मंदिर विश्वस्त संस्थेच्या प्रमुखांनी याबाबत भूमिका स्पष्ट के ली पाहिजे. त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनीही भूमिका स्पष्ट करणे गरजेचं आहे, असे संजय राऊत यांनी नमूद केलं.

चौकशीची काँग्रेसची मागणी

जमीन खरेदीतील कथित भ्रष्टाचार हा राजकीय मुद्दा नसून भूखंड घोटाळा आहे. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घ्यावी. या कथित घोटाळ्याशी संबंधित व्यक्तींच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करून गुन्हे नोंदवले जावेत, अशी मागणी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. राम मंदिर उभारणीचे काम स्थगित करण्याची मागणी काँग्रेसने केली नसल्याचेही सुरजेवाला यांनी सांगितले. देशातील कोटय़वधी लोकांनी श्रद्धेपोटी राम मंदिर उभारणीसाठी देणग्या दिल्या आहेत. या निधीचा गरवापर करणे अधर्म व पाप असून श्रद्धेचा अपमान असल्याची टीका काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वढेरा यांनी केली. राम म्हणजे न्याय, सत्य, धर्म असून रामाच्या नावाने फसवणूक करणे अधर्म असल्याची टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.