शुक्रवारी मुंबईतील साकीनाका परिसरामध्ये एका महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली. आज घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात या महिलेचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणावर सर्वच स्तरांमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. भाजपाकडून या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं जात आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा गंभीर बनल्याची टीका केली जात आहे. त्यातच भाजपाचे कांदिवलीतील आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. आपल्या ट्वीटर हँडलवरून अतुल भातखळकर यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

“फुटकळ गोष्टींवर प्रतिक्रिया देणारे…”

आपल्या ट्वीटमध्ये अतुल भातखळकर यांनी, “इकडच्या-तिकडच्या फुटकळ गोष्टींवर प्रतिक्रिया देणारे जाणते शरद पवार तूर्तास वामकुक्षी घेत आहेत का?” अशा शब्दांत खोचक सवाल केला आहे. राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना सातत्याने अतुल भातखळकर लक्ष्य करताना दिसतात. यामध्ये राज्यातील राजकीय मुद्द्यांपासून अनेक नागरी समस्या, तसेच करोनासंदर्भातलं नियोजन या गोष्टींवरून देखील त्यांनी राज्य सरकारवर ट्वीटरच्या माध्यमातून टीका केली आहे.

 

Sakinaka Rape Case : “आम्ही भाषणाच्या पलिकडे काही करू शकलो नाही, ही हार आहे आमची”, चित्रा वाघ यांना भावना अनावर!

अतुल भातखळकर यांच्याआधी भाजपाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी शनिवारी सकाळी राजावाडी रुग्णालयात पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना भावनिक प्रतिक्रिया दिली. “आम्ही यात काहीही करू शकलो नाही. आम्ही भाषणं देण्यापलीकडे, घोषणा देण्यापलीकडे काहीही करू शकलो नाहीत. ही हार आहे आमची आणि याचंच मला दु:ख आहे”, असं चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या.

 “साकीनाका बलात्कार प्रकरणात एकच आरोपी आहे, दुर्दैवाने महिलेचा जबाब…”; पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची माहिती

“महिलांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका!”

“खरंतर मी नि:शब्द झालेय. माझ्याकडे या विषयावर बोलायला शब्द नाहीत. ज्या राक्षसी पद्धतीने एका महिलेवर अत्याचार झाले. मी तिला बघून आले. अक्षरश: तिचे आतडे कापले गेले. तिच्या गुप्तांगात रॉड टाकला गेला. हे कुठेतरी थांबायला हवं. आता आमचे शब्द संपले, महाराष्ट्रातल्या महिलांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका हे मला सरकारला, व्यवस्थेला सांगायचंय. गेल्या ८ दिवसांत १३ वर्षांच्या मुलीवर १४ लोकांनी बलात्कार केला, ६ वर्षांच्या मुलीवर रिक्षात बलात्कार झाला. ठाण्यात अतिरिक्त आयुक्तांची बोटं छाटली गेली. आज सकाळी अमरावतीत १७ वर्षांच्या ७ महिन्यांच्या गर्भवती मुलीवर बलात्कार झाला, तिने गळफास लावून संपवून घेतलं. साकीनाक्यातली ही महिला मृत्यूशी झुंज देत होती. आम्ही यात काही करू शकलो नाही. आम्ही भाषणं करण्यापलीकडे, घोषणा देण्यापलीकडे काही करू शकलो नाहीत. ही हार आहे आमची. आणि याचंच मला दु:ख आहे”, अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.