नागपूरमधील ८५ वर्षीय नारायणराव दाभाडकर यांच्या निधनानंतर त्याबद्दल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली होती. दुसऱ्या करोना रुग्णासाठी नारायणराव दाभाडकर यांनी स्वत:हून रुग्णालयातला बेड सोडला आणि घरी परतणं पसंत केलं, असं त्यांच्या कुटुंबीयांसोबतच अनेकांकडून सांगण्यात आलं. खुद्द मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी देखील तशा आशयाचं ट्वीट केलं होतं. मात्र, त्यानंतर ते दाखल असलेल्या रुग्णालयाकडून वेगळाच दावा करण्यात आल्यामुळे या प्रकरणावरून नवी चर्चा सुरू झाली होती. त्यावर आता भाजपा नेते अवधूत वाघ यांनी एक वादग्रस्त ट्वीट केलं आहे. “आम्हाला दाभाडकरांचे संस्कार हवेत, दाभोळकरांचे नाहीत…”, असं ट्वीट अवधूत वाघ यांनी केलं आहे.

नेमकं झालं काय?

बुधवारी नागपूरमधल्या या घटनेची अचानक चर्चा सुरू झाली होती. ‘‘मी आता ८५ वर्षांचा आहे. मी माझे सर्व आयुष्य जगून घेतले. मला उपचाराची गरज नाही. माझी रुग्णशय्या तुम्ही या गरजू रुग्णाला द्या आणि त्याच्यावर उपचार करा’’, असे सांगून ते घरी परतले आणि तीन दिवसांनी देवाघरी गेले, अशा आशयाची ज्येष्ठ नागरिक नारायणराव दाभाडकर यांची त्यागकथा बुधवारी समाजमाध्यमांवर सर्वत्र पसरली. मात्र, संबंधित रुग्णालयानेच त्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने उलटसुलट चर्चेला तोंड फुटले.

दाभाडकरांचे कुटुंबीय म्हणतात…

“माझे वडील करोनाबाधित होते. त्यांना इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले त्या वेळी रुग्णालयात खाट मिळावी, म्हणून गोंधळ सुरू होता. अनेक लोक रडत होते. ते पाहून माझ्या वडिलांचे मन द्रवले. माझी स्थिती नाजूक आहे, पण मला घरी जायचं आहे. माझी खाट गरजूला उपयोगी ठरेल, असे त्यांनी सांगितले. खूप समजावूनही मला घरी घेऊन चला, असा त्यांचा आग्रह होता. घरी आल्यानंतर दीड दिवसाने त्यांनी जगाचा निरोप घेतला. आम्हाला कोणतेही भांडवल करायचं नाही. पण त्यांनी केलेला हा त्याग समाजासाठी आदर्श आहे,” अशी भावना त्यांची मुलगी आसावरी दाभाडकर-कोठीवान यांनी व्यक्त केली आहे.

मात्र, रुग्णालयाचा वेगळाच दावा!

“नारायणराव दाभाडकर यांना २२ एप्रिलच्या संध्याकाळी रुग्णवाहिकेतून येथे आणण्यात आले. ते स्वत: चालत आल्याने त्यांची प्रकृती स्थिर वाटत होती. त्यांना करोनाची लक्षणे असल्याने तातडीने रुग्णालयातील आकस्मिक विभागात दाखल केले. ऑक्सिजन आणि इतर औषधोपचार सुरू झाले. रात्री ७.५५ वाजताच्या दरम्यान त्यांनी रुग्णालयात राहायचे नसल्याचं सांगत घरी जाण्याचा आग्रह धरला. तुमचे वय अधिक असून, करोनामुळे जीवाला धोका संभावतो, असं त्यांना डॉक्टरांनी सांगितले. परंतु, त्यांनी स्वत: जोखीम पत्करून रुग्णालयातून सुटी घेतली,” अशी माहिती गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. शीलू चिमुरकर (गंटावार) यांनी दिली आहे. “यावेळी त्यांनी माझी खाट दुसऱ्या रुग्णाला द्या, असे काहीही सांगितले नाही. त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना असे काही सांगितले असेल तर मला कल्पना नाही. त्यांच्या नातेवाईकांनीही मला याबाबत काहीही कळवलेले नाही,” असंही डॉ. शीलू यांनी स्पष्ट केलं आहे.

एका त्यागकथेची उलट-सुलट चर्चा

दरम्यान, नारायण दाभाडकर यांच्या निधनानंतर त्यावरून हा सगळा वाद सुरू असताना अवधूत वाघ यांनी केलेल्या ट्वीटवरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.