अमरावती :  भाजपने पुकारलेल्या ‘अमरावती बंद’ला लागलेले हिंसक वळण हे आगामी काळातील विद्वेषाच्या राजकारणाचे संके त देणारे ठरू शकते. त्यामुळेच धार्मिक धृवीकरणातून आपले स्थान भक्कम करण्याचा भाजपचा हा प्रयत्न असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

अमरावतीचा गेल्या काही दशकांचा इतिहास पडताळून पाहिला तर जातीय-धार्मिक दंगलींचा एकही संदर्भ सापडत नाही. पण, शनिवारी शहरात थेट दंगलसदृशच स्थिती निर्माण झाली होती. भाजपच्या ‘बंद’ला व्यापारी संघटनांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे साहजिकच मुख्य बाजारपेठ बंद होती. पण, दंगलखोरांनी विशिष्ट समुदायातील दुकानदारांना लक्ष्य केले, बंद दुकानांची तोडफोड, जाळपोळ के ली आणि त्यानंतर दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया उमटत गेल्या. कालपर्यंत भाजपचे स्थानिक नेते कायदा व सुव्यवस्था बिघडत चालल्याचा आरोप करीत होते. पण, प्रत्यक्षात भाजपच्याच आंदोलनात ही व्यवस्था पायदळी तुडवली गेल्याचे चित्र दिसले.

भाजपला अमरावती जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करता आलेली नाही. महापालिका ताब्यात असली, तरी जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपले स्थान भक्कम व्हावे, यासाठी भाजप नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. वऱ्हाडात हिंदू, मुस्लिमांची तुल्यबळ संख्या लक्षात घेता, मतांच्या धृवीकरणातून हे शक्य होऊ शकते, याचा अंदाज भाजपला आला आहे.

त्यामुळेच कालच्या हिंसक घटनांचे निमित्त साधून भाजपने सुनियोजितपणे निषेध व्यक्त करण्याची जागा निवडली, अशी चर्चा रंगली आहे.

अमरावती महापालिके ची निवडणूक तोंडावर आली आहे. भाजपसमोर सत्ता राखण्याचे आव्हान आहे. राज्यात सत्ता नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. गटागटांमध्ये विखुरलेल्या भाजपमध्ये आता नेतृत्वासाठी देखील चढाओढ सुरू झाली आहे. या अस्वस्थतेतूनच मतांचे धृवीकरण  घडवून आणण्यासाठी संधीचा शोध भाजपमध्ये सुरू झाल्याची प्रतिक्रि या उमटत आहे.

अमरावतीत घडलेली हिंसाचाराची घटना दुर्दैवी आहे. जातीय विद्वेषाचे राजकारण होऊ न देण्याची काळजी सर्वांनाच घ्यावी लागणार आहे. भाजपने मात्र निवडणूक डोळयासमोर ठेवून हालचाली सुरू केल्याचे चित्र दिसत आहे. प्रशासनाने दोन्ही बाजूंच्या दंगलखोरांवर कठोर कारवाई के ली पाहिजे. – डॉ. सुनील देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष, काँग्रेस</strong>

शुक्रवारी घडलेला हिंसक प्रकार अत्यंत निंदनीय होता. व्यापाऱ्यांना मारहाण झाली. त्याचा निषेध म्हणून भाजपने पुकारलेल्या बंदला शंभर टक्के  प्रतिसाद मिळाला. काही लोक बंद हाणून पाडण्यासाठी समोर आले. त्याचा प्रतिकार म्हणून काही घटना घडल्या आहेत.  – शिवराय कुळकर्णी, प्रदेश प्रवक्ते, भाजप