राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभा सदस्यपदाच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत असून त्यासाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, भाजपाने  या निवडणुकीसाठी संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली होती. मात्र, महाराष्ट्राच्या परंपरेनुसार ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली होती. या विनंतीला मान देत आणि राज्याची परंपरा कायम राहावी, यासाठी भाजपाचे उमेदवार संजय उपाध्याय यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते तथा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपाच्या उमेदवाराने माघार घ्यावी, असे आवाहन केले होते. काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत असून एखाद्या नेत्याच्या निधनामुळे होणारी पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची परंपरा आहे, याचा उल्लेख काँग्रेस नेत्यांनी चर्चेत केला. काँग्रेस नेत्यांच्या आवाहनाचा विचार करून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पक्षाच्या कोअर कमिटीच्या सदस्यांशी विचारविनिमय केला आणि भाजपाने उमेदवारी अर्ज मागे घ्यावा असा निर्णय घेतला. त्यानुसार मुंबई भाजपा सरचिटणीस संजय उपाध्याय यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. तसेच राज्यसभा पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झालेल्या काँग्रेस नेत्या रजनी पाटील यांचे अभिनंदन केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp candidate sanjay upadhyay withdrew his nomination rajya sabha elections will be unopposed hrc
First published on: 27-09-2021 at 13:00 IST