सांगली : केंद्र व राज्यात भाजप प्रणित सरकार असल्याने तासगावच्या विकास कामांना निधीची उणिव भासणार नाही. रखडलेली विकास कामे पूर्ण करण्यासाठी भाजपला विजयी करावे असे आवाहन नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या चव्हाण-धाबुगडे यांनी बुधवारी केले.

तासगाव नगरपालिका निवडणुकीमध्ये थेट नगराध्यक्ष पदासाठी पंचरंगी लढत होत असून यामुळे प्रचारातही मोठी चुरस पाहण्यास मिळत आहे. भाजपने यावेळी महायुतीतील अन्य घटक पक्षाना बाजूला ठेवत स्वबळाचा नारा दिला असून स्वप्नील पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल मैदानात उतरवले आहे. तर माजी खासदार संजयकाका पाटील यांनी राजकीय पक्षाशी दूर राहून स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुक रिंगणात उडी घेतली आहे.

याशिवाय आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेनेने नगराध्यक्ष पदासाठी स्वतंत्र उमेदवार दिले असल्याने या ठिकाणी पंचरंगी लढत होत आहे. नगरपालिकेची सत्ता मिळवण्यासाठी जोरदार चुरस असल्याने याचे प्रचिती प्रचारातही पाहण्यास मिळत आहे.

बुधवारी संविधान दिनाचे औचित्य साधून भाजपच्या उमेदवार श्रीमती चव्हाण- धाबुगडे यांनी शहरातील डॉ. आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून प्रचार फेरीचा प्रारंभ केला. यावेळी मतदारांशी संवाद साधत असताना उच्च विद्याविभुषित असल्याने नागरी समस्यांची कशी सोडवणूक करायची याची मला महिती आहे. तसेच दिल्ली, मुंबईत भाजपची सत्ता असल्याने समस्या सोडवत असताना निधीची उणिव कधी भासणार नाही. यामुळे मला मतदार निश्‍चितपणे नगराध्यक्ष पदाची संधी देतील असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

माजी खासदार पाटील यांच्यादृष्टीने तासगाव नगरपालिका निवडणुक प्रतिष्ठेची बनली आहे. लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही पराभूत झाल्याने त्यांच्या राजकीय अस्तित्वाची ही निवडणुक असल्याने त्यांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांची जाहीर सभा आयोजित करून आघाडीच्या पाठीशी मतांची बेरीज करण्याचा प्रयत्न केला आहे, तर आमदार पाटील यांनी एक प्रभाग एक मुक्काम अशी संकल्पना घेउन नगरपालिका निवडण्ाुकीत चुरस निर्माण करण्याचा चंग बांधला आहे.