scorecardresearch

अमोल कोल्हेंच्या नथुराम गोडसेवरुन सुरु असलेल्या वादावर भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “अफझल खानाचीही…”

खासदार अमोल कोल्हे यांनी या चित्रपटामध्ये नथुराम गोडसेची भूमिका साकारल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

BJP, Chandrakant Patil, NCP, Amol Kolhe, Why I Killed Gandhi, Nathuram Godse
खासदार अमोल कोल्हे यांनी या चित्रपटामध्ये नथुराम गोडसेची भूमिका साकारल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटावरुन नवा वाद सुरु झाला आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी या चित्रपटामध्ये नथुराम गोडसेची भूमिका साकारल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडूनही विरोध होऊ लागला आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्यासह राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अमोल कोल्हेंच्या या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे.

“एखादी भूमिका करतो म्हणजे…”; खासदार अमोल कोल्हेंचे नथुराम गोडसेच्या भूमिकेवरुन स्पष्टीकरण

दरम्यान भाजपाकडूनही यावर प्रतिक्रिया आली असून यामध्ये काही चुकीचं नसल्याचं म्हटलं आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीव्ही ९ शी बोलताना सांगितलं की, “एक अभिनेता म्हणून त्यांनी नथुराम गोडसेची भूमिका करणं यात मला काही चुकीचं वाटत नाही. ते नथुराम गोडसेच्या विचाराच्या बाबतीत समंत आहेत का हे त्यांनी एकदा जाहीर करावी. ती विरोधाची भूमिका मावळली का हा मुद्दा आहे”.

अमोल कोल्हेंच्या नथुराम गोडसेवरुन आव्हाडांचा इशारा; म्हणाले, “विरोध करणार, कलाकाराचा वेष घेऊन…”

पुढे बोलताना ते म्हणाले की, “अभिनेता कोणाचीही भूमिका करु शकतो. नथुराम गोडसेची करु शकतो…अफझल खानाचीही करु शकतो. त्याला काय होतं. म्हणजे मला नथुराम गोडसे अफझल खान आहे असं म्हणायचं नाही. सध्या संवदेनशील वातावरण असल्याने कशावरुनही वाद निर्माण होऊ शकतो त्यामुळे अफझल खान बाजूला ठेवू. पण एक अभिनेता कोणाचीही भूमिका करु शकतो”.

कधी प्रदर्शित होणार हा चित्रपट?

अमोल कोल्हे यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ चित्रपटाचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट ३० जानेवारी २०२२ ला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. यावर अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून या चित्रपटाचे शूटिंग आपण राजकारणात येण्याच्या आधीच झाले होते असे त्यांनी म्हटले आहे.

अमोल कोल्हे काय म्हणाले?

“२०१७ साली या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. ज्यावेळी कोणत्याही सक्रिय राजकारणात नसताना मी ही भूमिका साकारली होती. एखादी भूमिका करतो म्हणजे त्या विचारधारेसोबत सहमत असतो असे कलाकार म्हणून कधीच नसते. काही विचारांसोबत आपण सहमत असतो. तर काही विचारधारांसोबत सहमत नसतानाही आपण ती भूमिका करतो. माझ्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक आयुष्यातसुद्धा नथुराम गोडसेचे उदात्तीकरणाच्या संदर्भात मी कधीही भूमिका घेतलेली नाही. केवळ एक कलाकार म्हणून भूमिका साकारणे आणि त्याचा राजकीय विचारांसोबत संबंध जोडला जाणे या दोन विभिन्न गोष्टी आहेत,” असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

आव्हाड यांचा विरोध…

मात्र जितेंद्र आव्हाड यांनी अमोल कोल्हेंनी ही भूमिका साकारल्याचा निषेध नोंदवलाय. “अमोल कोल्हे यांच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते की अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे ची भूमिका केलेली आहे. त्यांनी केलेली कृती जरी कलाकार म्हणून केली असली, तरी त्यामध्ये नथुराम गोडसेचे समर्थन आलेच आहे. कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही,” अशा शब्दांमध्ये आव्हाड यांनी आपली नाराजी व्यक्त केलीय.

तसेच पुढे बोलताना, “विनय आपटे, शरद पोंक्षे यांना या भूमिकेबद्दल महाराष्ट्रातील पुरोगामी जनतेने प्रचंड विरोध केला त्यामुळे त्याच भूमिकेबरोबर राहून या गांधी विरोधी चित्रपटाला विरोध करणार,” असंही आव्हाड म्हणाले आहेत.

“कलाकार आणि माणूस दोन वेगळ्या भूमिका नाहीत. पण जेव्हा गांधी साकारता भूमिका बदलत नाही कारण ती वैचारिक भूमिका आहे. नथुराम महाराष्ट्राला लागलेला डाग आहे. कलाकार म्हणून अमोल कोल्हे महान आहेत, पण त्यांनी केलेल्या अभियानाचा विरोध आहे,” असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp chandrakant patil ncp amol kohle why i killed gandhi nathuram godse sgy

ताज्या बातम्या