“एकवेळ काँग्रेस परवडली, तिथे दरोडेखोर नसतात”; चंद्रकांत पाटलांनी साधला राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा

राष्ट्रवादीने सलगी करणं यासाठी भाजपा कधीही भुलणार नाही; चंद्रकांत पाटलांनी केलं स्पष्ट

BJP, Chandrakant Patil, NCP, Congress, Jayant Patil, ST Employee, चंद्रकांत पाटील, भाजपा, राष्ट्रवादी, जयंत पाटील, एसटी कर्मचारी संप
राष्ट्रवादीने सलगी करणं यासाठी भाजपा कधीही भुलणार नाही; चंद्रकांत पाटलांनी केलं स्पष्ट

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच २८ टक्के महागाई भत्त्यासह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून सुरू केलेले बेमुदत उपोषण गुरुवारी रात्री मागे घेतले. महागाई भत्त्याबरोबरच काही मागण्या मान्य झाल्याने एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने हा निर्णय घेतला. मात्र कृती समितीने घेतलेली भूमिका मान्य नाही, असं म्हणत सोलापुरात एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन पुकारलं. कृती समिती शासनासोबत डील करतं असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी सहकारमंत्री सुभाष देसाई पोहोचले होते. यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली.

राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील सांगलीमध्ये भाजपमध्ये सलगी करत आहेत असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “राष्ट्रवादी हा कधीच भरवशाचा पक्ष नाही. सकाळी एक, दुपारी एक आणि संध्याकाळी एक राजकारण करतात. एकवेळ काँग्रेस परवडली. काँग्रेसमधली सगळी व्यक्तिमत्वं सुसंस्कृत असतात, ते दरोडेखोर नसतात”.

एसटी कर्मचाऱ्याने एसटीला लटकून घेतला गळफास; दिवाळीच्या तोंडावरच अहमदनगरमध्ये धक्कादायक घटना

“राष्ट्रवादीने सलगी करणं यासाठी भाजपा कधीही भुलणार नाही. राष्ट्रवादी भाजपासोबत सलगी करण्याच्या त्यांच्या डावाला फसणार नाही,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

अहमदनगरमध्ये एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेलं आंदोलन मागे घेतल्यावर दुसऱ्या दिवशी अहमदनगरमध्ये एका एसटी कर्मचाऱ्यानं गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव आगारातील दिलीप हरिभाऊ काकडे या एसटी कर्मचाऱ्याने एसटीच्या मागील बाजूस असलेल्या शिडीला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे शेवगाव आगरात आणि एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे. दिलीप काकडे यांच्याजवळ कोणतीही सुसाईड नोट आढळून आलेली नाही.

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरण, महागाई भत्ता वाढ आणि घरभाडे भत्ता वाढ या मागण्यांसाठी नुकतंच काम बंद आंदोलन सुरू झालं होतं. मात्र, राज्य शासनाने यातील काही मागण्या मान्य केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. दिलीप हरिभाऊ काकडे हे महाराष्ट एसटी कामगार संघटनेचे सदस्य होते. ५६ वर्षीय दिलीप काकडे यांनी बसच्याच मागच्या शिडीला गळफास घेत आत्महत्या केल्यानं विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासह भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केलीय.

“अशाच आत्महत्या होत राहिल्या तर महाराष्ट्रात आगडोंब उसळेल”

“एका बाजूला एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करू सांगता आणि दुसऱ्या बाजूला एसटी कर्मचारी वैफल्यातून आत्महत्या करतात. आता तरी सरकार जागं होणार आहे की नाही? एसटी कर्मचाऱ्यांच्या अशाच आत्महत्या होत राहिल्या तर महाराष्ट्रात आगडोंब उसळेल. त्याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची असेल,” असा इशारा प्रविण दरेकर यांनी दिलाय.

“तळपायाची आग मस्तकात जाणारी, मनाचा थरकाप उडवणारी घटना”

गोपीचंद पडळकर म्हणाले, “तळपायाची आग मस्तकात जाणारी, मनाचा थरकाप उडवणारी, ऐन दिवाळीच्या तोंडावर अत्यंत दु:खद घटना घडलीये. अहमदनगर विभागातील शेवगाव आगारात दिलीप खटके या एसटी महामंडळातील कर्मचाऱ्याने आत्महत्या केलीये. खटके कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. हे दु:ख शब्दात सांगणही कठीण आहे.”

हेही वाचा : आर्थिक अडचणीत सापडलेल्या ‘एसटी’ला शासनाकडून दिलासा ; ६०० कोटी रुपयांची मदत मिळणार

“माझी सर्व एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीची विनंती आहे की कुणीही टोकाचं पाऊल उचलू नका. एकजूटीनं आपण हा लढा लोकशाही मार्गानं जिंकू. या आत्महत्या केलेल्या २८ कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देऊ,” असंही पडळकर यांनी म्हटलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bjp chandrakant patil on ncp congress jayant patil st employee protest sgy

Next Story
‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना
ताज्या बातम्या