एकनाथ खडसे करणार राष्ट्रवादीत प्रवेश? चंद्रकांत पाटील म्हणतात…

चंद्रकांत पाटील यांना खडसे पक्षाचं नुकसान करणार नाहीत असा विश्वास

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे नाराज असून पक्षातील नेत्यांवर तसंच देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. एकनाथ खडसे यांनी अनेकदा जाहीरपणे आपल्याला इतर पक्षांकडून ऑफर असल्याचंही सांगितलं आहे. त्यातच आता एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. एकनाथ खडसे किंवा राष्ट्रवादीकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे अशी कोणती भूमिका घेणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला आहे. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितलं की, “एकनाथ खडसे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. पक्षांना आजवर त्यांना भरभरुन दिलं आहे. त्यामुळे पक्षाचं नुकसान होईल अशी कोणती भूमिका ते घेणार नाहीत. याआधीही त्यांच्याबद्दल अशा चर्चा झाल्या असून त्या अफवा ठरल्या आहेत. हीदेखील अफवाच ठरेल”.

आणखी वाचा- खडसेंचा डीएनए त्यांना दुसऱ्या पक्षात जाऊ देत नाही – सुधीर मुनगंटीवार

जयंत पाटील यांनीही केलं भाष्य
शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशावर चर्चा झाली का ? असं विचारण्यात आलं असता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नकार दिला. एकनाथ खडसेंबाबत कोणतीही चर्चा झाली नाही असं ते म्हणाले.

“एकनाथ खडसे यांच्याबाबत कोणतीही चर्चा आजच्या बैठकीत झाली नाही. जळगाव जलसिंचन प्रकल्पाबाबत बैठकीत चर्चा झाली,” अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली असल्याचं वृत्त टीव्ही ९ ने दिलं आहे. तसंच एकनाथ खडसेंच्या नाराजीबाबत त्यांच्या पक्षाने विचार करावा असा सल्ला यावेळी त्यांनी दिला. सोबतच राजकारणात जर-तरला महत्त्व नसते असं सांगत एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशाचं वृत्त फेटाळलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bjp chandrakant patil on reports of eknath khadse joining ncp sgy