पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन तासच झोपतात, आता झोप लागू नये यासाठी प्रयत्न करत आहेत असं वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. कोल्हापुरात बोलताना त्यांनी यानंतर मोदी २४ तास जागे राहतील असंही म्हटलं. कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीच्या आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. कार्यकर्त्यांना संबोधित करताना चंद्रकांत पाटलांनी केलेल्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
“झोपच लागणार नाही यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयोग करत आहेत. आता मोदी दोन तास झोपतात, नंतर ते २४ तास देखील झोपणार नाहीत,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना २०२४ च्या निवडणुकीच्या तयारीला लागण्याचा आदेश दिला.




“२०२४ ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ४०० पेक्षा अधिक जागा आपल्याला जिंकायच्या आहेत. संसदेत अनेक गोष्टी करायच्या असून त्यासाठी एक तृतीयांश बहूमत पाहिजे. त्यामुळे कामाला लागा. २०२४ मध्ये आपलीच सत्ता आली पाहिजे,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ६० देशांना लस पुरवली आहे. हिंदू जगाला किती उपयोगी ठरतोय हे आपण जगाला दाखवून देऊ. यापूर्वी दोनवेळा देशात हिंदूंचं वर्चस्व झालं होतं. पृथ्वीराज चौहान आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर आता नरेंद्र मोदींच्या काळात हिंदूंचे वर्चस्व होत आहे. याचा अर्थ मी मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करत नाही,” असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.